करोनाबाधितांची
संख्या वाढू लागली
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते आयसीएमआर आणि इतर केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून देखील सातत्याने देशवासीयांना संभाव्य रुग्णवाढीसंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. गेल्या २ दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली नव्या बाधितांची संख्या गेल्या २४ तासांत पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे. देशभरात नव्या आकडेवारीनुसार ४१ हजार १५७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ५१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातून
आईने वाचविले मुलीचे प्राण
चंद्रपूर जिल्ह्यात अर्चना मेश्राम आपल्या ५ वर्षीय मुलीसह गावाजवळील जंगलात भाजी तोडण्यासाठी गेली होती. आई भाजी तोडत असताना मुलगी प्राजक्ता थोड्या दूर उभी होती. बिबट्याची नजर या मुलीवर पडली आणि त्याने हल्ला केला. सुरुवातीला अर्चनाला काही कळलंच नाही. बिबट्याचा सामना कसा करायचा यासाठी तिने आरडाओरड सुरु केली. मात्र जवळपास कुणीच नव्हते. बिबट्याने मुलीचं तोंड जबड्यात घेतलं होतं. जंगलात नेण्यासाठी प्रयत्न करत असताना तिने क्षणाचाही विलंब न करता जवळच असलेला दांडा तिने हाती घेतला आणि बिबट्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. अर्चनाचा आक्रमक बाणा पाहताच बिबट्याने मुलीला सोडून तिथून धूम ठोकली.
सामना सुरू असताना स्टेडियमबाहेर
चार जणांना गोळ्या घातल्या
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथील नॅशनल पार्क स्टेडियमच्या बाहेर चार जणांना गोळ्या घालण्यात आल्या. या स्टेडियमवर बेसबॉलचा सामना सुरू होता. प्रेक्षक बाहेर गेल्याने अचानक सामना थांबवण्यात आला. या सामन्याला हजारो दर्शक उपस्थित होते. वॉशिंग्टन नॅशनल्स आणि सॅन डिएगो पॅड्रेस या संघात हा सामना सुरू होता.
एआयएमआयएम पक्षाचं
अधिकृत ट्विटर खातं हॅक
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम) पक्षाचं अधिकृत ट्विटर खातं हॅक झालं आहे. हॅकर्सने पक्षाच्या नावाऐवजी एलन मस्क यांचं नाव लिहीलं आहे. त्याचबरोबर डीपीवर एलन मस्क यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच स्पेक्सएक्स आणि टेस्लासारख्या कंपनीचे मालक आहेत. हे खातं कुणी हॅक केलं आणि का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
भारताने अफगाणिस्तानात तयार
केलेल्या इमारती पाडण्याच्या सूचना
अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तालिबाबनं डोकं वर काढलं आहे. अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. जवळपास ८५ टक्के भागावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधील हजारो दहशतवाद्यांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भारताने अफगाणिस्तान तयार केलेल्या इमारती पाडण्याच्या सूचना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत. गेल्या दोन दशकात भारतानं अफगाणिस्तानात गुंतवणूक केली आहे.
कोल्हेंनी स्वतःची लायकी
पाहून बोलावं : शिवाजी आढळराव
खासदार अमोल कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही खासदार कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “बायपास रस्त्याचं काम मी खासदार असताना सुरु झालं होतं. या कार्यक्रमाला मला डावलण्यात आलं. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावं एवढीच माझी अपेक्षा होती. कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावं. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे?,” असं आढळराव पाटील म्हणाले.
मुंबईत पावसामुळे तीन
दुर्घटना, 18 जणांनी प्राण गमवाले
रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत. यात आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या
तर त्यांचे स्वागत : शंभुराज देसाई
भाजप नेत्या पंकजा मुंडे या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरुन राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं होते. त्यावरुन शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडेंना थेट शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे.
नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के
मंत्र्यांवर गंभीर गुन्हे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत 36 जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेने याबाबत अहवाल जाहीर केलाय. यात मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्याधीश असल्याचंही नमूद करण्यात आलंय. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात यावरुन चर्चेला उधाण आलंय.
उत्तर प्रदेश सरकारची
बहुचर्चित कावड यात्रा रद्द
सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर अखेर उत्तर प्रदेश सरकारने बहुचर्चित कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले.
धार्मिक भावना विचारात घेऊन यंदा प्रतीकात्मक यात्रा आयोजित करू देण्याच्या निर्णयाचाही फेरविचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांचे आरोग्य आणि त्यांचा जगण्याचा हक्क सर्वांत महत्त्वाचे आहे. इतर सर्व भावना, मग त्या धार्मिक का असेनात, या सर्वांत प्राथमिक अशा मूलभूत अधिकाराच्या अधीन आहेत, असे भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केले होते.
भारतीय नौदलात ‘एमएच-६०आर’
प्रकारातील दोन हेलिकॉप्टर दाखल
भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक बहुउद्देशीय ‘एमएच-६०आर’ प्रकारातील दोन हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत. अमेरिकी नौदलाकडून यातील पहिली दोन हेलिकॉप्टर्स देण्यात आली आहेत. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. सेन्सरच्या साहाय्याने पाणबुड्यांचा शोध घेण्याची ताकद यामध्ये आहे.
दहावीचा निकाल, तांत्रिक
त्रुटीसंदर्भात चौकशी करणार
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे 16 जुलैला दहावीचा निकाल काल जाहीर झाला. सकाळी विभागनिहाय पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना वेबसाइटवर निकाल पाहता येणार होता. पण संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. याची दखल घेत राज्य मंडळामार्फत दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीसंदर्भात शासनाने चौकशी समिती गठीत केली आहे.
चीनच्या कुरापती, भारतीय
सीमेत बांधकाम करण्यास सुरुवात
भारत चीन सीमा रेषेवर गेल्या दीड वर्षापासून तणाव आहे. वारंवार चीनच्या कुरापती सुरूच आहेत. मागच्या एक वर्षापासून चीनने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता चीनने सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.
मागच्या एक वर्षापासून चीनने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
SD social media
9850 60 3590