राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अॅड. माजिद मेमन, पवन वर्मा आणि समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती दिली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नव्हती. भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत. पण व्हिजन नाही. देशाला व्हिजन देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही देशाला व्हिजन देऊ, असा दावा राष्ट्रमंचच्या नेत्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी घेतलेली बैठक तिस-या आघाडीसंदर्भात नव्हती असा दावा माजी खासदार माजिद मेमन यांनी केलाय. पवारांच्या घरी बैठक घेतली असली तरी बैठक राष्ट्रमंचचे अध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी बोलावल्याचंही त्यांनी सांगितंलं. तसंच या बैठकीचं काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण दिल्याचं त्यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या पाच खासदारांना या बैठकीचं आमंत्रण होतं. यामध्ये मनिष तिवारी, कपिल सिब्बल, डॉ. अभिषेक मनुसिंघवी, शत्रुघ्न सिंन्हा यांचा समावेश आहे. पण काहीजणांची खरोखरच अडचण होती, ज्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे ही काही काँग्रेसला वेगळं पाडण्यासाठी मोठी आघाडी तयार होत आहे, अशा प्रकारच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत असं अॅड. माजिद मेमन यांनी स्पष्ट केलं.
देशाला व्हिजन देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आीली. देशातलं अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ यावर सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील टीम देशाला व्हिजन देणार असल्याचं सपाचे नेते घनश्याम तिवारी यांनी सांगितलं.
अडीच तासांच्या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषदेत बोलतील असं वाटत होतं. बैठक संपल्यानतंर पवार बाहेर आले खरे पण मीडियासमोर बोलण्यास त्यांनी टाळलं. बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, बैठकीत काँग्रेस आणि शिवसेने येणं का टाळलं याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट, आमदार प्रताप सरनाईक यांचं पत्र, तसंच राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्दयावंर शरद पवार बोलतील असं वाटत होतं. पण पवारांनी मीडियासमोर येणं टाळलं.