मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक; दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने केली मात

महिला प्रीमियर लीगमधील (WPL) सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने २ बाद १०९ धावा केल्या.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईने १५ षटकांत २ बाद १०९ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी या सामन्यात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सायका इशाक, इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. यानंतर यस्तिका भाटियाने फलंदाजीत सर्वाधिक ४१ धावा केल्या. हेली मॅथ्यूजने ३२ धावांचे योगदान दिले. नताली सीव्हर २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ धावा करून नाबाद राहिली.

त्याआधी दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने २५ आणि राधा यादवने १० धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरीआकडा गाठता आला नाही. मुंबईचा पुढील सामना १२ मार्चला यूपी वॉरियर्सशी होणार आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स संघ ११ मार्च रोजी गुजरात जायंट्सशी भिडणार आहे.

मुंबईचा संघ तीन सामन्यांतून तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबईचे सहा अंक झाले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला स्पर्धेतील तीन सामन्यांत पहिला पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांतून दोन विजयांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. दिल्ली संघाचे चार अंक आहेत. त्याचबरोबर या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार सायका इशाकला मिळाला.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.