पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या महिला प्रीमिअर लीगच्या हंगामातील पाचवा सामना यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान खेळला गेला त्यात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्सवर ४२ धावांनी शानदार विजय मिळवत ग्रुपमधील पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवले आहे. आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या या दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र दिल्लीने दमदार प्रदर्शन करत यूपीला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. ताहिला मॕग्राने काही काळासाठी यूपीच्या आशा पल्लवित केल्या होत्या मात्र तिची झुंज एकाकी ठरली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जेस जॉन्सनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दिल्लीने ठेवलेल्या २१२ धावांचे ठेवलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली. कर्णधार एलिसा हिली आणि सलामीवीर श्वेता सेहरावत यांच्यात पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी झाली. कर्णधार एलिसा हिली १७ चेंडूत २४ धावा काढूनबाद झाली. मागच्या सामन्यात अर्धशतक करणारी किरण नवगिरे चांगली खेळी करू शकली नाही ती केवळ २ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या ताहिला मॅकग्रा आणि दीप्ती शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अष्टपैलू दीप्ती शर्माने संथ फलंदाजी करत संघाला अडचणीत आणले, तिने २० चेंडूत १२ धावा करत राधा यादवकरवी झेलबाद झाली.
देविका वैद्यने ताहिला मॕग्राची साथ देत २३ धावा केल्या पण ती आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाली. ताहिला मॕग्रा ने सर्वोत्तम फिनिशरची भूमिका निभावली. तिने ५० चेंडूत ९० धावांची एकाकी झुंज दिली जी अपयशी ठरली. अवघ्या १० धावांनी तिचे शतक हुकले. तिने या खेळीला ११ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला. या सामन्यात युपी संघाने पहिल्या सामन्यातील विजयाची शिल्पकार ठरलेल्या ग्रेस हॅरिस हिला बाकावर बसवले. त्यामुळे यूपीला पराभवाचा सामना करावा लागला यावर सोशल मीडियात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दिल्लीकडून जेस जॉन्सनने अष्टपैलू कामगिरी करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. शिखा पांडे आणि मारिजाने कॅप यांनी प्रत्येकी एक विकेट घेत तिला साथ दिली. क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नमुना प्रस्थापित करणारी राधा यादवने ३ झेल घेतले. तर अनेक ठिकाणी तिने उत्तम क्षेत्ररक्षण करत संघासाठी धावा वाचवल्या. कर्णधार मेग लॅनिंगनंतर जेस जॉन्सन आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शानदार फलंदाजीमुळे दिल्लीने यूपीसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करणे यूपीसाठी सोपे नव्हते.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत दिल्ली संघाने सुरुवातीला संथ फलंदाजी केली, परंतु नंतर शेफाली वर्मा आणि कर्णधार लॅनिंग यांनी आपले गियर बदलले. दोघांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत मोठे फटके खेळले. त्यामुळे दिल्लीने पहिल्या सहा षटकांतच ६२ धावा जोडल्या होत्या. यानंतर शेफाली वर्मा १४ चेंडूत १७ धावा करून बाद झाली, पण दुसऱ्या टोकाला लॅनिंग मैदानातच राहिला. त्याने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
दिल्लीने नऊ षटकांत ८७ धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे सामना थांबला, पण लॅनिंगची आक्रमक फलंदाजी सुरूच होती. दरम्यान, १२ चेंडूत १६ धावा करून मारिजेन कॅपही बाद झाली. पुढच्याच षटकात ४२ चेंडूत ७० धावा करून कर्णधार लॅनिंगही तंबूत परतला आणि युपीचा संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र, अॅलिस कॅप्सीने हे होऊ दिले नाही. तिने १० चेंडूत २१ धावांची तुफानी खेळी करत दिल्लीला सामन्यात परत आणले.