आज दि.४ मे च्या दिवसभरातील घडलेल्या ठळक घडामोडी अशा…

रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयाने शेअर बाजार आपटला; गुंतवणकदारांचं काही मिनिटात हजारो कोटींचं नुकसान

रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे काही मिनिटात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल दोन वर्षांनी रेपो दरात वाढ केली आहे. RBI च्या या घोषणेनंतर शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची घसरणी पाहायला मिळाली.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी दुपारी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात वाढ करणार असल्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स जवळपास 1400 अंकांनी खाली आला. तर निफ्टी देखील घसरुन 16800 वर आली आहे.

पेट्रोल, गॅस आणि आता रेपो रेट.. थेट संबंध नसला तरी सामान्य माणसालाच बसणार सर्वाधिक झळ

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेट आणि सीआरआर मध्ये वाढ करण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आरबीआयने रेपो दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे, तर सीआरआर म्हणजेच रोख राखीव प्रमाण 50 बेसिस पॉइंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल होतील का? महागाई वाढेल की कमी होईल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

संजय राऊतांनी वाजवला चुकीचा ‘भोंगा’, मनसेवर केलेली टीका भोवण्याची शक्यता

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी मशिदीवर अजान पठण करण्यात आली नाही. तर शिर्डीत आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही’ असा दावा करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीका केली. पण, शिर्डीत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री आरती होत असल्याचं समोर आलं आहे.’भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनूवर्ष भोंग्यांद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते, अशी टीका राऊत यांनी केली होती.

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यातून गेली 73 वर्ष मोफत प्रवास करतायेत नागरिक

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत लांब रेल्वे नेटवर्क आहे, तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं लांब नेटवर्क आहे. आपण भारतीय रेल्वेच्या काही नेक्ससबद्दल काही बोलायचं झाल्यास देशातील रेल्वे ट्रॅकची लांबी 68 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
भारतात एक खास रेल्वे रूट आहे, जिथे प्रवास करण्यासाठी तिकीट लागत नाही. हा प्रवास अगदी फ्री असतो. काही खास लोकांनाच या स्पेशल फ्री रेल्वे रूटवर प्रवास करण्याचं भाग्य लाभतं असंही नाही. या रूटसाठी कोणतीही पात्रता किंवा शासकीय सेवे नोकरी असण्याची आवश्यकताही नाही. या 13 किमी लांबीच्या रूटवर कोणीही येऊन विनामूल्य प्रवास करू शकतो आणि तिकीटाच्या तपासणीसाठी इथे कोणताही TTE देखील येणार नाही. पंजाबमधील भाक्रा-नांगल हा रेल्वे रूट पूर्णपणे फ्री आहे. या ठिकाणी विनातिकीट मोफत प्रवास करता येतो.

रब ने बना दी जोडी! 36 इंचाच्या नवरदेवाला भेटली 34 इंचाची नवरी; कपलची एक झलक पाहण्यासाठी गर्दी

जोड्या स्वर्गात बनतात असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय पाहायला मिळतो आहे तो बिहारमध्ये. जिथं कमी उंचीच्या जोडप्याचं लग्न झालं आहे. या अनोख्या जोडप्याची आणि त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होते आहे. या लग्नसोहळ्याला बिन बुलाए मेहमानही फक्त नवदाम्पत्याची एक झलक पाहण्यासाठी येत आहेत. त्यांनी एकच गर्दी केली आहे.
भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया हा लग्नसोहळा पार पडला. अभिया बाजारातील किशोरी मंडल उर्फ गुजो मंडल यांची लेक 24 वर्षांची ममता कुमारी आणि मसारूतील बिंदेश्वरील मंडल यांचा 26 वर्षांचा मुलगा मुन्ना भारती दोघं लग्नबंधनात अडकले आहेत. इतर लग्नांप्रमाणेच ममता आणि मुन्नाचं लग्न झालं. पण तरी त्यांच्या लग्नाची चर्चा होते आहे, याचं कारण म्हणजे या कपलची उंची. नवरा-नवरीच्या उंचीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

राजीव गांधींनी केव्हा केलं होतं ‘ते’ वक्तव्य; PM मोदींनी आठवण करुन देताच उडाली खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपियन देशांच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी जर्मनीतील बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. तसंच ‘मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो, पण जनतेपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचतात, असं आता कोणत्याही पंतप्रधानाला सांगावं लागणार नाही,’ असं मोदी म्हणाले. एक रुपयातील 85 पैसे गायब करणारा असा कोणता पंजा होता? असं काँग्रेसचं नाव न घेता मोदींनी विचारल? त्यांचा हा खोचक सवाल राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याला अनुसरून होता.

एक आयडिया आणि भन्नाट ब्रँडिंग, निवृत्त IAS पतीच्या PFच्या पैशातून लोणच्याचा व्यवसायाला सुरुवात, आता लाखोंची उलाढाल

अनेक कारणांनी देशात आणि जगात बिहारमधील मिथिलांचलाची ओळख निर्माण झाली आहे. पण सध्या मिथिलांचलाची चर्चा दरभंगा येथे राहणाऱ्या कल्पना झा आणि उमा झा या दोन महिलांमुळे होत आहे. या नणंद-वहिनीच्या जोडीने गेल्या काही महिन्यांत केलेल्या कामामुळे त्यांचं कौतुक होतंय. कल्पना झा आणि उमा झा या दोघी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘व्होकल फॉर लोकल’चे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही महिलांनी मिथिलांचलातील खास लोणच्याच्या चवीची ओळख देशाला आणि जगाला करवून दिली आहे. या स्थानिक लोणच्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळावी, यासाठी या दोघी कसोशीने प्रयत्न करत आहेत. दोघींना व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात यश मिळाले असून, लोकांना या खास लोणच्याची चव खूप आवडली आहे.

LIC IPO साठी खास मोठा निर्णय; ‘या’ दिवशीही गुंतवणूकदारांना लावता येणार बोली

LIC चा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे आणि आजपासून रिटेल म्हणजे छोटे गुंतवणूकदार त्यांच्या बोली लावू शकतात. या बोलीसाठी 9 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण असा निर्णय गुंतवणूकदारांसाठी घेण्यात आला आहे, जो इतर कोणत्याही IPO साठी होत नाही. निर्णय असा आहे की जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शनिवारी देखील IPO साठी अर्ज करू शकाल.

याआधी इतर कोणत्याही IPO साठी असा निर्णय क्वचितच घेतला गेला असेल. LIC चा IPO हा भारतातील सर्वात मोठा IPO असल्याने, प्रत्येक इच्छुक गुंतवणूकदाराला त्यासाठी बोली लावण्याची पूर्ण संधी दिली जात आहे.

SD Socail Media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.