कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत अनेक मृतदेह वाहताना पाहून देशभरात खळबळ उडाली. मृतदेहांची अशी अवस्था पाहून अनेकजण हळहळले, तर अनेकांनी सरकारवर नियोजन शून्यतेचा आरोप करत टीकास्त्रही डागलं. याच घटनेवर गुजरातच्या कवयित्री पारुल खक्कर (Gujrati Poet Parul Khakhar) यांनीही कविता केली आणि काही दिवसातच ती देशभरात गाजली. अनेक भाषांमध्ये या कवितेचं भाषांतरही झालं, मात्र याच कवितेवरुन गुजरात साहित्य परिषदेने या कवयित्रींना थेट नक्षली ठरवलंय. त्यामुळे गुजरातमध्ये एकच गदारोळ पाहायला मिळालाय. व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवल्यानं कवयित्री नक्षली कशा? असाही संतप्त सवाल साहित्य क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे .
गुजरातच्या साहित्य परिषदेने गंगा नदीतील वाहणाऱ्या मृतदेहांवरुन सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या कवयित्रींना नक्षली म्हटल्यानं नवा वाद तयार झालाय. साहित्य परिषदेने असं म्हणताना कवयित्रींवर अराजकता पसरवण्याचा आरोप केलाय. परिषदेने आपल्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय, “या कवितेत ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आलाय तो कवितेला शोभत नाही. अशाप्रकारची विचारसरणी केवळ केंद्र सरकारच्या विरोधी विचारसरणीत आहे. हा विचार नक्षली साहित्यिकांचा आहे.”
गुजरात साहित्य परिषद एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या कवितेला कविता मानण्यासच नकार दिला. “ही कविता नसून अराजकता पसरवण्याचा प्रकार आहे. ही कविता कोणत्याच दृष्टीकोनातून कविता नाहीये. हा केवळ विनाकामाचा आक्रोश आहे,” असा आरोप केला. तसेच कवितेतील मतांशी सहमत नसल्याचंही म्हटलंय.
महाराष्ट्रातील कवी संतोष पवार यांनी गुजरात साहित्य अकादमीच्या या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय. ते म्हणाले, “गुजरात साहित्य अकादमीच्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकामध्ये अकादमीचे अध्यक्ष विष्णु पांड्या यांनी संपादकीयमध्ये पारुल खक्कर या कवयित्रीला नक्षलवादी, अराजकतावादी ठरवलं आहे. ‘त्या ‘ कवितेला – कवितेचं ‘राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा’ हे शीर्षक मात्र त्यातून पूर्णपणे वगळून टाकले आहे. ही कविता तरी आहे का असा बालिश प्रश्न तिथे उपस्थित केला आहे.”
“खरा लिहिता लेखक हा सत्याचीच बाजू घेतो. उन्मादात बुडालेल्या गुजरातमधून आलेला पारूल यांचा आवाज खतरनाक होता. आता तो तिथल्या मोदी शहा या रंगा-बिल्ला चमचांना बोचतो आहे. अकादमीचे अध्यक्ष दुतोंडी असून त्यांचा जाहीर निषेध आहे. याच अध्यक्ष पांड्या यांनी पारूल या गुजरात साहित्याचा उगवता तारा आहे म्हटले होते. तो उगवला तर हे त्या ताऱ्यावर थुंकायला निघाले आहेत. अखिल भारतातील लेखक पारूल यांच्या पाठीशी उभे राहतील. पारूल यांना गुजरातमध्ये काही अडचण असेल तर त्यांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करण्याची मोहीम राबविण्यात येईल,” असंही मत संतोष पवार यांनी व्यक्त केलं.