फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सोलापुरातील इंजीनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. मनिष विजयराज बंकापुर (वय 23) असे अटक तरूणाचे नाव आहे.
तो सध्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरूणाचा शोध घेऊन त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
दरम्यान, सोशल मिडियावर, इंटरनेटवर अश्लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफी सर्च करणे,पाहणे,शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संबंधिताला पहिल्या दोषसिध्दीस पाच वर्षाची कैद तर दहा लाखांच्या दंडाची शिक्षा आहे. तर दुसऱ्यांदा दोषारोप सिध्द झाल्यास त्याला सात वर्षांची कैद आणि दहा लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.अशा बाबींवर सायबर क्राईमचा वॉच असून संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. सोलापुरातील तरूणावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती.
त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या तरुणाची खात्री केली. त्याच्या मोबाईलचा ‘आयपी’ ऍड्रेसचा शोध घेऊन त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली.