देशात 3 कोटी लसीकरण करणारं
महाराष्ट्र राज्य अव्वल
कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. देशात तीन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात आज दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांना लस देण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा निर्बंध
लागण्याची शक्यता
डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणारी वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं संकट कायम असल्याने घाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात नवे करोनाबाधित, मृतांच्या
आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ
महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. करोनाच्या Delta Plus Variant मुळे देखील राज्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लस करोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
आरोपी तहव्वुर राणाचे
प्रत्यार्पण पुन्हा रखडले
मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा सध्या तरी अमेरिकेतच असणार आहे. पुढील सुनावणीपर्यंत हा निर्णय असेल असं लॉस एंजिल्समधील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. राणाचा २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत प्रयत्नशील आहे. यासाठी लॉस एंजिल्सच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटला सुरु आहे. याप्रकरणी न्यायालयाने १५ जुलैपर्यंत अतिरिक्त दस्ताऐवज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधातील
५००० हजारहून अधिक गुन्हे मागे
पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या योगी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाअंतर्गत ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्यांच टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दोन कोटी लोकांच्या जीवासाठी
लढलो हाच माझा गुन्हा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑक्सिजनची गरज वाढवून सांगितल्याच्या आरोपांवर आता प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भावनिक होत केजरीवाल म्हणाले की मी दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो हाच माझा गुन्हा. त्यांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे.
फ्लोरिडा येथील १२ मजली
इमारत पत्त्यासारखी कोसळली
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामी समुद्र किनाऱ्याजवळ असलेली एक १२ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत एक जण दगावला आहे. तर ९९ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत १०२ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढलं आहे. क्रेनच्या मदतीने ढिगारा बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. फ्लोरिडा सरकारने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद
यांना ट्विटरने केलेले लॉक
केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वादाचा पुन्हा एक नवा अंक आज समोर आला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटवर आपल्याला लॉगइन करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. जवळजवळ तासभर आपल्याला लॉगइन करुन देण्यात आलं नाही. यासाठी अमेरिकेतील कॉपीराईट कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं मला सांगण्यात आल्याचं रवि शंकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.
स्पुतनिक वी लस पुणे शहरातील
खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध
भारत सरकारनं आपापर्यंत तीन कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सीरमची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी (Sputnik V) लसीला मंजुरी देण्यात आली आहे. स्पुतनिक वी लसीचे भारतातील वितरण हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत आहे. स्पुतनिक वी लस आता पुणे (Pune) शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. स्पुतनिक वी लसीचा एक डोस 1142 रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.
डेक्कन क्वीन 26 जूनपासून
प्रवाशांच्या सेवेत
राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत.
जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा
दर्जा देण्याची हीच वेळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय गुपकार नेत्यांची दिल्लीत बोलावलेली बैठक तब्बल साडेतीन तास चालली. या बैठकीत या सर्वपक्षीय नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. काँग्रेसकडून या बैठकीत सहभागी झालेल्या गुलाम नबी आझाद यांनी मोदींकडे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यापासून 5 मागण्या केल्या. या बैठकीत कलम 370 चाही मुद्दा चर्चेला आला. मात्र, सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याचं सर्व पक्षांनी मान्य केलं.
पेट्रोलचे दर 125 रुपयांवर
पोहोचण्याची शक्यता
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे, तर दुसरीकडे सरकारने जागतिक क्रूड तेलाच्या किंमती नियंत्रणा बाहेर असल्याने आपण काहीही करु शकत नाही असे म्हणत सरकारने आपले हात वर केले आहेत की, आम्ही यात काहीही करु शकत नाही. मग खरोखर आपल्याकडे पेट्रोल व्यतीरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही? भविष्यकाळात दर कमी होण्याची काही शक्यता नाही? यावर सर्व ब्रोकरेज हाउस आणि तज्ज्ञांचे मत आहे की, नाही कच्चे तेल स्वस्त होणार नाही.
सोशल मीडियावरील फेक
अकाऊंट बंद होणार
सध्या समाज माध्यमांचा (social media) बोलबाला आहे. एखादी बाब समाज माध्यमांवर पोस्ट केली तर लगेच व्हायरल होते. मात्र, चांगली गोष्ट असेल तर ठिक. मात्र, बदनामी करणारी पोस्ट किंवा एखाद्याला टार्गेट करण्यासाठी फेक अकाऊंटची मदत घेतली जाते. त्यामुळे एखाद्याची नाहक बदनामी होते. याला आता चाप बसणार आहे. कारण सोशल मीडियावरील फेक अकाऊंट बंद होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावरील फेक अकाऊंट बंद करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590