कोरोना काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या माध्यमातून आपला व्यवसाय चांगलाच वाढवला. खूप कमी वेळेत हा डिजीटल व्यवसाय मोठा नफा देणारा ठरला. असं असलं तरी रिलायन्सचा सर्वात जुना व्यवसाय हा पेट्रोकेमिकलचा आहे. पेट्रोलियम व्यवसायात अंबानींकडून मागील काही वर्षांत फार मोठी घोषणा झाली नाही. असं असलं तरी पेट्रोलियम व्यवसायाबाबत सौदी आरामकोसोबतच्या भागीदारीची चर्चा अद्याप संपलेली नाही. आता मुकेश अंबानींना एका दिवसात तब्बल 34 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा नफा झाल्याची माहिती समोर आलीय. हा नफा पेट्रोलियम व्यवसायातूनच झाल्याचं बोललं जातंय.
शुक्रवारी (28 मे) ब्रोकरेज फर्म जेफ्रीजच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं, “रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल व्यवसायाची एबिटा म्हणजेच आर्थिक उलाढाल 50 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल व्यवसायाची वाढ सध्या जोरदार आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या ओटूसी बिझनेसमध्ये भागिदारीची शक्यता वाढणार आहे. ब्रोकरेज फर्मच्या या रिपोर्टचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेयरवरही दिसला.
ब्रोकरेज फर्म जेफ्रीजच्या या बातमीनंतर या आठवड्यातील शेवटच्या व्यावसायिक सत्रात रिलायन्सच्या शेअर्समध्ये जवळपास 6 टक्क्यांची दमदार वाढ दिसून आली. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2095.95 रुपयांवर बंद झाला. याचा परिणाम मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीवरही झाला. मुकेश अंबानींची संपत्तीत एका दिवसात जवळपास 34 हजार कोटींपेक्षा अधिक वाढ झाली. या वाढीसह मुकेश अंबनी यांनी आशियातील आपली पकड मजबूत केलीय. संपत्तीत 34 हजार कोटी रुपयांची वाढ झाल्यानंतर मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 81 अब्ज डॉलरवर (जवळपास 6 लाख कोटी) पोहचली आहे.