गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात 132 झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.
मुंबईत कालपासूनच जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे काल 16 मे रोजी मुंबईत 50 झाडे उन्मळून पडली. तर आज सकाळी 8 ते 10 या दोन तासात एकूण 132 झाडे कोसळून पडली आहेत. त्यात शहरात 59, पूर्व उपनगर 15 आणि पश्चिम उपनगरातील 58 झाडांचा समावेश आहे. सुदैवाने झाड कोसळल्याने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही. तसेच कुणालाही मार लागला नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर आज एका झाडाची फांदी कोसळली. ओव्हरहेड वायरवर ही फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लगेचच धूर निघाला. त्यामुळे लोकल तात्काळ थांबवावी लागली. परिणामी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड दूर केलं. ‘मिड-डे’ या दैनिकाने त्याबाबतचं ट्विट केलं आहे.
मुंबईत एकूण पाच ठिकाणी घरे पडणे आणि भिंती खचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही मार लागला नाही. मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे.