आज दि.१ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सत्यजीत तांबेंचं ‘जय श्रीराम’, राम नवमीलाच भाजप प्रवेशाचा सेतू!

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे रामनवमीच्या दिवशी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत संगमनेरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्यजित तांबेंची आता पुढील वाटचाल “जय श्रीराम ” म्हणत होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.नाशिक पदवीधर मतदारसंघाची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. तेव्हापासूनच काँग्रेस किंवा राज्यातील पक्षश्रेष्ठीपासून तांबेचा दूरावा वाढलेला आहे. 22 वर्षे ज्या काँग्रेस पक्षासाठी सत्यजित तांबे यांनी दिवसरात्र एक केले आणि पक्षसंघटन बांधले त्यांना मात्र नाशिक पदवीधर निवडणूकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यामुळे सत्यजित तांबे नाराज आहेत. या अगोदर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी

Donald Trump Porn star bribery case डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान  एका पोर्न स्टारला मौन राखण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. ‘मॅनहटन ग्रॅंड ज्युरी’ने हा निर्णय दिला. अमेरिकी लोकशाहीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना असून गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प यांनी मात्र स्वत:वरील आरोप फेटाळले आहेत.

“संजय राऊतांना धमकी देणारा दारूच्या नशेत”, फडणवीसांच्या विधानावर सुनील राऊतांचं प्रत्युत्तर

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांना धमकी मिळाली आहे. ‘दिल्ली में मिल, तुझे एके-४७ से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप,’ असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना आला आहे. धमकी मिळाल्यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार सुनील राऊत यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.संजय राऊत यांना धमकी देणारा दारूच्या नशेत होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत विचारले असता सुनील राऊत यांनी सांगितले, “दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाइल नंबर कसा मिळाला? महाराष्ट्रात भरपूर लोक आणि नेते आहेत. मग त्याने संजय राऊत यांनाच धमकी का दिली? सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार पुण्यात सापडले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गोष्टी गंभीररीत्या घेत प्रामाणिक कारवाई करावी.”

बुद्ध पौर्णिमेला सरकारी सुट्टी मागणाऱ्या याचिकाकर्त्याला मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले

बुद्ध पौर्णिमेला सरकारी सुट्टी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. अशी मागणी भगवान बुद्ध यांनीही मान्य केली नसती, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

IPPB ने लॉन्च केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता मोबाईलवरही करता येणार वापर

सध्या Airtel कंपनीचे ५जी नेटवर्क देशातील सर्वात जास्त शहरांमध्ये पसरलेले आहे. तसेच IPPB बँक देखील भारतीय सरकारद्वारे चालवण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. Airtel आणि India Post Payments Bank म्हणजेच IPB ने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर बँकिंग सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.व्हाट्सअ‍ॅप मेसेजिंग सोल्युशन Airtel IQ द्वारे ग्राहकांपर्यत पोचवले जाणार आहे. यामध्ये एक क्लाउड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सर्व्हिस आहे जी ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांशी व्हॉइस, एसएमएस आणि व्हाट्सअ‍ॅपवर संवाद साधण्याची परवानगी देते. एअरटेलने दावा केला आहे की व्हाट्सएपसाठी बिझनेस सर्व्हिस प्रोव्हायडर (BSP) म्हणून काम करणारी ही जगातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे.

“पाकिस्तानी लोकांना वाटतं फाळणी ही मोठी चूक होती”, मोहन भागवत यांचं वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत एका भाषणादरम्यान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही पाकिस्तानमधील लोक आनंदी नाहीत. आता त्यांना मान्य आहे की, भारताची फाळणी ही एक चूक होती. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. देशाच्या विविध भागातील सिंधी समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.भागवत म्हणाले, अखंड भारत हेच सत्य आहे, खंडित भारत एक दु:स्वप्न आहे. भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र पाकिस्तानला सात दशकांहूनही अधिक काळ लोटला तरी तिथले लोक दुःखी आहेत. परंतु भारतात सूख आहे. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधी समुदायाला भागवत संबोधित करत होते. यावेळी भागवत म्हणाले की, आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे.

दुबई, चीनमधून येणाऱ्यांची चाचणी बंधनकारक करा, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना

परदेशातून येणाऱ्या २ टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे. या पार्श्वभूमीवर दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी बंधनकारक करण्याची सूचना करोना राज्य कृती दलाने राज्य सरकारला केली आहे.

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अलीकडेच सर्व अधिकारी आणि करोना राज्य कृती दलासोबत आढावा बैठक घेतली. परदेशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच चीन आणि दुबईमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना कारोना राज्य कृती दलाने राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत.

इंदूर विहीर दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६; दोघांविरोधात गुन्हा

मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका मंदिराच्या पुरातन विहिरीवरील (बारव) छत कोसळून ३६ भाविकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शुक्रवारी मंदिराच्या दोन विश्वस्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. येथील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी हवन-पूजन सुरू असताना हा अपघात घडला. त्यात २१ महिला व दोन लहान मुलांसह ३६ जणांचा मृत्यू झाला.बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सेवाराम गलानी आणि सचिव मुरलीकुमार सबनानी यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर विहिरीवर छत टाकून असुरक्षित बांधकाम केल्याचा आरोप आहे, इंदूर महापालिकेने मंदिर संकुलातील हे अवैध बांधकाम हटवण्याचे आदेश विश्वस्त मंडळाला दिले होते, परंतु विश्वस्त मंडळाने तसे करण्याचे आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही. या दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पंजाब किंग्जच्या फलंदाजांचा धमाका; राजपक्षेचं वादळी अर्धशतक, कोलकाताला १९२ धावांचं आव्हान

आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा दुसरा सामना आज मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वात कोलकाताचा संघ पंजाब किंग्जशी भिडण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, मैदानात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. भानुका राजपक्षेनं वादळी अर्धशतक ठोकलं. तर कर्णधार शिखर धवनने ४० धावांची खेळी साकारली. त्यामुळे पंजाबने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १९२ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

भारत-चीन सीमेवर महाराष्ट्राचा जवान शहीद, चिपळूणच्या जवानासोबत दुर्दैवी घटना

भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी रेकी करत असताना भुस्खलन झाल्यामुळे महाराष्ट्रातील चिपळूण येथील जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. सुभेदार अजय ढगळे यांचा बर्फ आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ढगळे यांचे पार्थिव सोमवारी चिपळूण मधील मुळगावी चोरवणे आणण्यात येणार आहे.

रोहित-विराट येणार आमने-सामने, तिकिटासाठी चाहते रात्रभर रांगेत

शुक्रवार पासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने धोनीच्या चेन्नई संघाचा पराभव केला. या सामन्यानंतर आता रविवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना रंगणार आहे. बंगळुरुच्या  एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पार पडणार असून तो पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.