पुढचे दोन आठवडे सूर्य आग ओकणार, हवामान खात्याकडून महत्त्वाची सूचना
राज्यात मागच्या चार दिवसांपासून कोरडे वातावरण दिसत आहे. यामुळे राज्यातील तापमानात कमालीची वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी राज्यात पावसाची स्थिती असल्याने वातावरणात कमालीचा बदल होत होता. दरम्यान पुढचे काही दिवस तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एप्रिलचे पहिले दोन आठवड्यात तापमान वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी पडत असल्याचे चित्र होते. दरम्यान मागच्या दोन दिवसांत पारा 38 अंशांपर्यंत आला आहे. आजपासून (ता.02) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
‘मविआ’च्या सभेला काँग्रेस नेते नाना पटोले राहणार गैरहजर; कारणही आलं समोर
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला आता काही वेळ उरला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. अशात नाना पटोले उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.महाविकास आघाडीची महत्त्वाची सभा असताना मित्रपक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकृती अस्वस्थ असल्याने सभेला उपस्थित राहणार नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
खासदार अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? इन्स्टा पोस्टने एकच खळबळ
अभिनेते अमोल कोल्हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि अभिनय क्षेत्रातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. चाहतेही त्यांच्या पोस्टला भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात. दरम्यान अमोल कोल्हे यांनी असं काही पोस्ट केलं आहे, जे पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.अमोल कोल्हे यांनी एक वृत्त लिहिलेला फोटो शेअर केला आहे. या वृत्तामध्ये लिहलं आहे. ‘राष्ट्रवादीचे खासदार-अभिनेते अमोल कोल्हे पत्नीला कंटाळले आहेत. ‘वाजले की बारा’ फेम अमृता खानविलकरच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर आपल्या पतीला घटस्फोट देऊन विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे. या लग्नाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही उलट अमृताशी लग्न करुन मीही उपमुख्यमंत्री होईन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकरण्यांना असे म्हटले जाते.
अमोल कोल्हे यांनी हे वृत्त शेअर करत लिहलंय, ”हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं?नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!”
सरपंच प्रवीण गोपाळे हत्याकांडात मोठी अपडेट समोर
प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळमधील शिरगावच्या सरपंचांवर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केल्याची घटना घडली होती. या घटनेत सरपंच प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींनी प्रवीण गोपाळे यांच्या हत्येपूर्वी परिसराची रेकी केल्याची माहिती समोर येत आहे.
नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात नारायण राणे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्यानं नारायण राणे यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. हा राणेंसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
‘….मग माझा खून झाला तरी चालेल’ केतकी चितळेची खळबळजनक पोस्ट
अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. मध्यंतरी तिला शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावरून अटक करण्यात आली होती. त्यावेळी देखील केतकी चितळेचं नाव चांगलच चर्चेत आलं होतं. आता केतकी चितळेनं एक अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळं ती पुन्हा चर्चेत आलं आहे. सर्वांचं लक्ष तिच्या या पोस्टनं वेधलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या केतकी चितळेनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिनं तिचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की,मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली 7 वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल’ अशी पोस्ट केतकीने केली आहे.
निधी अभावी आरोग्य विभागाची अवस्था दयनीय!
करोना काळातील आरोग्यसेवेच्या सक्षमीकरणाची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक अर्थसंकल्पात आरोग्याला दुप्पट निधी देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने आरोग्य विभागाने अनेक चांगल्या योजना राबविण्याचा निर्णय घेत अर्थसंकल्पात मोठ्या निधीची मागणी केली. मात्र प्रत्यक्षात राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्यामुळे डायलिसीस सेवेचा विस्तार, हृदयविकार रुग्णांसाठी कॅथलॅब स्थापन करणे तसेच ग्रामीण भागातील मुतखड्याच्या रुग्णांसाठी लिथोट्रेप्सी मशिन खरेदी तसेच कर्करोग उपचारासह बहुतेक योजना रखडल्या आहेत. गंभीरबाब म्हणजे अर्धवट बांधकाम झालेल्या रुग्णालयांची कामे पूर्ण करण्यासाठीही अत्यंत अपुरी तरतूद करण्यात आली आहे.
‘देव’ धावतो दररोज २५ किमी; ‘अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये विक्रम करण्याचे ध्येय
देशासाठी आपणही काही योगदान द्यावे, या ध्यासातून त्याला धावण्याचा छंद जडला. डोंगर, शिखर, किल्ले अशा खडतर धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ’अल्ट्रा ट्रेल रेस’मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करायचे उद्दिष्ट पायांमध्ये साठवून ‘देव’ दररोज २५ किमी धावतो. त्याचे परिश्रम फळास आले असून भारताकडून ’अल्ट्रा ट्रेल रेस’साठी त्याची निवड झाली आहे.पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील देव श्रीरंग चौधरी याचा धावण्याचा सराव अचंबित करणारा आहे. बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलेला देव धावण्याच्या सरावासोबतच चरितार्थासाठी शेती करतो. धनोडा (ता. महागाव) येथे त्याची शेती आहे. ‘अल्ट्रा रन रेस’ धावणारा तो विदर्भातील एकमेव तरुण आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सर्व डोंगर, किल्ले, शिखर त्याने धावून अत्यंत कमी वेळेत सर केले आहेत. रस्त्यांवरील धाव स्पर्धा, क्रीडा मैदानावरील स्पर्धा व टेकडीवरील स्पर्धांमध्येही सातत्याने धावत आहे. आतापर्यंत त्याने ७० पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभाग घेवून बक्षिसे मिळविली आहेत. दिल्ली येथील इंडियन बॅकयार्ड अल्ट्रा रेसचे संचालक गगनदीप यांनी त्याला ‘धावणारा मराठी माणूस’ ही उपाधीच दिली आहे. देशासाठी ’अल्ट्रा रन रेस’मध्ये जिंकायचे या ध्यासाने देवला पछाडले आहे. या स्पर्धेत ४२ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर धावावे लागते. त्यामुळे त्याने अत्यंत कमी वेळात हे उद्दिष्टही गाठले आहे.
“सत्तेच्या हव्यासापोटी नितीश कुमार…”, बिहारमध्ये अमित शाह यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील नवादा येथे जनतेला संबोधित केलं. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर शाह यांनी टीकास्र डागलं आहे. नितीश कुमार पंतप्रधान होता होता राहिले. कारण, देशातील जनतेने ठरवलंय, की तिसऱ्यांदाही नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर येथील सरकार आपल्याच वजनाने पडेल. त्यानंतर कमळाचं सरकार स्थापन होईल. लोकसभेला ४० च्या ४० जागांवर उमेदवार निवडून द्या. दंगल करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ करू, असेही अमित शाह यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात ४८,२०,४९,००,००,००० रुपयांचा घोटाळा
अदाणी समूहातील कंपन्यांबाबत ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा अहवाल समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षाने संसदेत गोंधळ घालत अदाणी समूहाची संयुक्त संसदीय चौकशीची ( जेपीसी ) मागणी केली. तर, काँग्रेस राहुल गांधी अदाणी समूह प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करत आहेत. अशातच आता भाजपाने ‘काँग्रेस फाइल्स’चा पहिला भाग प्रदर्शित केला आहे.भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यावर लिहलं की, ‘काँग्रेसच्या काळात एकामागे-एक कसे घोटाळे झालेत पाहा’. तसेच व्हिडीओत ‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. ‘काँग्रेसने आपल्या ७० वर्षाच्या काळात जनतेचे ४८,२०,४९,००,००,००० रुपये लुटले आहेत. या पैशांचा वापर जनतेच्या विकासासाठी केला जाऊ शकत होता,’ असेही भाजपाने सांगितलं आहे.
किम जोंग-उन अण्वस्त्रयुद्धाची तयारी करतोय? उत्तर कोरियाच्या याँगब्योनमध्ये हालचाली वाढल्या!
एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध अद्याप संपलेलं नसून अजूनही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाहीये. रशियाकडून तर अण्वस्त्र वापर होण्याची शक्यताही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आधीच जगावर एका युद्धाचं सावट कायम असताना तिकडे उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इतर गोष्टींचं उत्पादन वाढवलं जात आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन अण्वस्त्रयुद्धाची तयारी करतोय की काय? भीती सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे.
अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास
गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी आघाडीचे हॉलिवूड स्टार्सही हजर होते. तर मनोरंजन विश्वा बरोबरच इतर अनेक क्षेत्रातली दिग्गज मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती. अंबानी यांच्या राजेशाही थाटातच त्यांनी सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं.यावेळी अंबानी कुटुंबीय आणि तेथे उपस्थित सर्व पाहुण्यांच्या लूकने तर सर्वांचं लक्ष वेधलंच पण याच बरोबर आता या उद्घाटन सोहळ्यातील जेवणाचा मेन्यू चर्चेत आला आहे.अभिनेते संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांनी या उद्घाटन सोहळ्यातील जेवणाच्या थाळीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताट आणि वाटीमध्ये जेवण देण्यात आलं. तर जेवणात भारतीय, परदेश असे विविध पदार्थ होते. विविध प्रकारचे स्टार्टर्स, दाल , रोटी, पालक पनीर, हलवा, पापड, लाडू असे अनेक पदार्थ खास पाहुण्यांसाठी बनवण्यात आले होते.
RCB ने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, रोहितच्या पलटणची फलंदाजी
आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारी मुंबई इंडियन्सची पटलण यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी सज्ज झाली आहे. ३१ मार्चपासून आयपीएलचे सामने रंगतदार होत असून तमाम क्रिकेटप्रेमींची आजचा सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स विरोधात झालेल्या मागील पाच सामन्यांपैकी सलग दोन सामन्यांमध्ये बंगळुरुने बाजी मारली आहे. त्यामुळे बंगळुरु आजच्या सामन्यात विजयाची हॅट्रिक मारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्सवर पराभवाचं सावट पसरलं होतं. परंतु, यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरुचा पराभव करून मुंबईला विजयाची दिशा मिळते का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत असून फाफ डु प्लेसिस आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
SD Social Media
9850 60 3590