राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामध्ये सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र, राज्य सरकारने ही योजना लागू करण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
जुनी पेन्शन योजना
पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळायची
निवृत्तीवेळी पगार 30 हजार रुपये
पेन्शन बसायचं- 15 हजार रुपये
ठोक रक्कम मिळत नव्हती
नवी पेन्शन योजना
पगाराची 8% रक्कम पेन्शन म्हणून मिळते
निवृत्तीवेळी पगार 30 हजार रुपये
मिळणारी पेन्शन- 2200 रुपये
ठोक रक्कम मिळते (अपवाद)
या 5 राज्यात जुनी पेन्शन योजना लागू
हिमाचल
पंजाब
प.बंगाल
राजस्थान
झारखंड
या राज्यात नवीन पेन्शन योजना कार्यक्रम
महाराष्ट्र
गुजरात
मध्यप्रदेश
हरियाणा
या संपामुळे राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालयांना या मोठा फटका बसू शकतो. संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो. त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्याने बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
दरम्यान, राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
नगरपरिषद कामगार आणि कर्मचारी संघटना संपावर
दरम्यान, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार आणि कर्मचारी संघटन आजपासून अनिश्चित कालीन संपावर आहे. याच संपामध्ये नागपूर महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. फक्त अग्निशमन आणि महापालिकेचे रुग्णालय अशा आकस्मिक सेवेचे कर्मचारी सोडून आजपासून महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत.