ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला टी२० वर्ल्ड कप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ धावांनी जिंकून फायनलमध्ये सातव्यांदा धडक मारली. तर भारतीय संघाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. या पराभवानंतर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर भावुक झालेली दिसली. सामन्यानंतर ती प्रेझेंटेशनवेळी गॉगल घालून आली होती. प्रेझेंटेटर बोलत असताना ती म्हणाली की, देशाने मला रडताना पहावं अशी ईच्छा नाही. त्यामुळे मी इथे गॉगल घालून आले.
मला वाटत नाही की देशाने माझ्या डोळ्यात पाणी बघावं, त्यामुळे मी इथं गॉगल घालून आलेय. पण मी शब्द देते की आम्ही खेळात सुधारणा करू आणि देशाला पुन्हा असं निराश होण्याची संधी देणार नाही असंही हरमनप्रीतने म्हटलं.
सामन्यातील पराभवाबद्दल बोलताना म्हटलं की, मी आणि जेमिमाह फलंदाजी करत होतो आणि त्यानंतर पराभूत होणं यासारखं दुर्दैवी काहीच नाही. आज आम्हाला याची अपेक्षा नव्हती. तसंच मी ज्या पद्धतीने धावबाद झाले त्याहून जास्त दुर्दैवी काही नाही. प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं. आम्ही शेवटच्या चेंडुपर्यंत लढण्याचं ठरवलं होतं. निकाल आमच्या बाजूने लागला नाही पण आम्ही या स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळलो त्यावर आनंदी आहे.
पराभवाची कारणे सांगताना हरमन म्हणाली की, सुरुवातीच्या विकेट गमावल्या तरी, आम्हाला माहिती आहे की आपल्याकडे चांगली बॅटिंग लाइन अप आहे. जेमीने केलेल्या फलंदाजीचं श्रेय तिला द्यावं लागेल. तिने वेग दिला जो आम्हाला हवा होता. अशा कामगिरीने आनंद होतो. तिला तिचा नैसर्गिक खेळ खेळताना आनंदी वाटलं. आम्ही ताकदीने खेळलो नाही पण सेमीफायनलमध्ये पोहोचलो. आम्ही सोपे झेल सोडले. तुम्हाला जिंकायचं असेल तर ते घ्यायला हवे. मिसफिल्डही झाली. यातून फक्त शिकू शकतो आणि चुका पुन्हा करू शकत नाही.