नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी हरल्या तर नेमकं काय होणार?

देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. देशातील सर्वात हायव्होल्टेज फाईट होत असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघावर सर्वांच्या नजरा आहेत. इथे बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध ममतांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांच्यात लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार ममता बॅनर्जींना इथे धक्का बसण्याची चिन्हं आहेत. कारण सकाळी 11.45 पर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, ममता बॅनर्जी या जवळपास 4500 मतांनी पिछाडीवर होत्या.

जर ममता बॅनर्जी हरल्या तर तृणमूलसाठी हा मोठा धक्का असेल. भाजपने ममतांच्या मंत्रिमंडळातील बडा चेहरा असलेले शुभेंदू अधिकारी यांनाच फोडल्याने, ममतांचा संताप अनावर झाला. त्यामुळे ममतांनी शुभेंदू अधिकारी यांचा गड असलेल्या नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याचा निर्धार केला. मात्र आपला बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांनी सध्यातरी नेटाने लढा देत, ममतांवर वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.

भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी यांनी 2016 मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह 10 आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे होते.

सध्याची आकडेवारी पाहता ममता बॅनर्जी या जरी पिछाडीवर असल्या, तरी तृणमूल काँग्रेसने मुसंडी मारली आहे. 292 जागांच्या विधानसभेत तृणमूलने 200 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप सध्या तरी 100 च्या आत गुंडाळताना दिसत आहे. असं असलं तरी ममतांचा जर नंदीग्राममध्ये पराभव झाला तर तृणमूलसाठी मोठी नामुष्की असू शकते.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाला तरी सरकार मात्र त्यांचंच म्हणजे तृणमूलचं येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. ममता बॅनर्जी पुन्हा शपथ घेऊन, सहा महिन्यांच्या आत कोणत्या तरी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार होऊ शकतात. त्यासाठी तृणमूलचा एखाद्या विजयी आमदाराला राजीनामा द्यावा लागू शकतो. मात्र जर पराभवाची नैतिकता म्हणून ममतांनी मुख्यमंत्रिपद नाकारलंच तर मात्र मुख्यमंत्रिपद दुसऱ्याला मिळू शकतं.

जर ममतांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं तर त्या आपल्या मर्जीतील माणसालाच मुख्यमंत्रिपद देणार हे निश्चित आहे. शोभानदेव चटोपाध्याय, पार्थ चॅटर्जी, कांचन मुलीक, सुब्रता मुखर्जी ही काही नावं आहेत, जी तृणमूल आणि विशेषत: ममता बॅनर्जी यांच्या विश्वासातील आहेत.

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नंदीग्राम मतदारसंघ येतो. ही पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाईल सीट आहे. नंदीग्राममध्ये एकूण 8 उमेदवार मैदानात आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी, सीपीआयएमच्या नेत्या मिनाक्षी मुखर्जी यांच्यासह इतर पाच उमेदवार मैदानात आहे. परंतु, मुख्य लढत ही ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातच आहे. सुवेंदू अधिकारी हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघाच्या इतिहासात इथे पाच वेळा CPI, दोन वेळा CPM, दोन वेळा काँग्रेस, एक वेळ जनता पार्टी आणि तीन वेळा TMC ने विजय मिळवला आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या जवळपास अडीच लाख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.