सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी भारतासह जगातील विविध देशांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. त्यानंतर संसर्गाचं प्रमाण आटोक्यात आल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. चीनमधील स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत भारतासह अनेक देश अलर्ट झाले आहेत. कोरोना संसर्ग पुन्हा वाढून आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी भारतात युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली आहे. या स्थितीत लोकांनी घाबरून न जाता, पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. लसीकरण, बूस्टर डोस या गोष्टींवर भर देणं आवश्यक आहे. लसीकरणाचा विचार करता भारत बायोटेकची नेझल वॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लवकरच बाजारात येत आहे. या लसीची किंमतदेखील निश्चित करण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारत सरकार सतर्क झाले आहे. अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल केली जात आहेत. रविवारी आठवड्याच्या अखेरीपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. परंतु, यामुळे भारतात कोरोना वाढतोय असं म्हणणं घाईचं ठरेल. `टीव्ही9 भारतवर्ष`ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेकच्या नेझल व्हॅक्सिनचं परीक्षण झालं असून तिला मंजुरीदेखील मिळाली आहे. ही लस लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या लसीची किंमतही निश्चित करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत जीएसटीसह 800 रुपये असेल याशिवाय रुग्णालयाचे शुल्क वेगळे असेल.
महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमध्ये तसेच तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गात किरकोळ प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. टीओआयच्या कोविड डाटाबेसनुसा, गेल्या आठवड्यात कोरोनाचे 1103 नवीन रुग्ण आढळून आले होते. पण या आठवड्यात ही संख्या 11 टक्क्यांनी वाढून 1219 झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी असून, गेल्या आठवड्यात 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्या तुलनेत या आठवड्यात हा आकडा 20 वर गेला आहे.
एका अहवालानुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्येकडे सातत्याने लक्ष ठेवावे आणि कोठेही वेगळ्या केसेस वाढल्यास त्याविषयीची माहिती तातडीने द्यावी, असं केंद्र सरकारने राज्यांना सांगितलं आहे. देशातील 684 जिल्ह्यांमधील कोविड-19 शीसंबंधित आकडेवारीनुसार हिमाचल प्रदेशातील कुल्लुत 14.29 टक्के तर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे 11.11 संसर्ग दर नोंदला गेला आहे. देशातील आठ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यात अरुणाचल प्रदेशातील लोहित (5.88टक्के), मेघालयमधील री भोई (9.09 टक्के), राजस्थानमधील करौली (5.71 टक्के), गंगानगर (5.66 टक्के), तामिळनाडूतील दिंडीगुल (9.80 टक्के) आणि उत्तराखंडमधील नैनिताल (5.66) या जिल्ह्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश ठिकाणं पर्यटन स्थळं आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.
दुसरीकडे, दिल्ली विमानतळावर कोरोनाशी संबंधित तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात काही प्रवाशांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलकाता विमानतळावर एक ब्रिटिश महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आणि तिला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले. काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने उद्भवलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सोमवारी रुग्णालयांना सामान्य औषधे खरेदी करण्याकरिता 104 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे.
दरम्यान, भारत बायोटेकची ही देशातील पहिली नेझल व्हॅक्सिन असेल, जी बूस्टर डोस म्हणून घेतली जाऊ शकते. या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. देशातील 14 ठिकाणी या लसीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 3100 लोक सहभागी झाले होते. डिसेंबरच्या सुरुवातीला भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन मार्केटमध्ये आणण्यास मंजुरी मिळाली होती.ही लस कमी पैशात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं तयार करण्यात आली आहे.
या नेझल व्हॅक्सिनला incovacc असं नाव देण्यात आलं आहे. भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, “भारताकडे प्रिकॉशनरी डोससाठी आता अजून एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने लोकांचे लसीकरण होण्यास मदत होईल. ही एक अशी लस आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि ती प्रभावी असल्याचे मानले जाते.ही लस 2 अंश ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवता येऊ शकते. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणासह देशातील काही भागांमध्ये या लसीसाठी साठवण व्यवस्था करण्यात आली आहे.