पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता

राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. 23 तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तर रत्नागिरीतही मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीला कालरात्रभर मुसळधार पावसाने झोडपले आहे. आजही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काल मुसळधार पावसामुळे मुंबईत दरडी कोसळून 33 बळी गेले आहेत. चेंबूरमध्ये 21 तर विक्रोळीत 10 तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर कण्यात आली आहे. मुंबईत जोरदार वादळी पाऊस झाला आहे. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत 200 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे.

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. चेंबूरमध्ये दरड कोसळली त्या ठिकाणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सकाळी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, शनिवारी रात्रीपासून मुंबईत तीन तासांत अडीचशे मिमी पाऊस पडला म्हणजेच ताशी 80 मिमी पाऊस पडला. ही अतिवृष्टीच होती. त्यामुळे ही दुर्घटना घडली. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती निर्माण झाली. उद्यानातील कार्यालये व कर्मचाऱ्यांची सेवा निवासस्थाने येथे पाणी शिरले.

मुंबईत जोरदार वादळी पाऊस झाला आहे. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत 200 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाचा फटका हा वसई-विरार शहराला बसला आहे. विरारमधील जाधव पाडा येथील चाळीत पाणी शिरले होते.

पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या, विशेषत: दरडीकोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे.

यावेळी बोलतांना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले की, पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी म्‍हणाले की, मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्‍याचे श्री. काकाणी यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.