टेबल टेनिसमधील भारताचा आघाडीचा खेळाडू अंचता शरथ कमलला बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये बुधवारी सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळय़ात स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे, बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, बॅडिमटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांच्यासह २५ क्रीडापटूंना ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कार बहाल करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिनी होणारा हा कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षी निवड प्रक्रिया लांबल्यामुळे पुढे ढकलावा लागला होता.
टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शरथला वयाच्या ४०व्या वर्षी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा कमलचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ा वाजवल्या. कमलने कारकीर्दीत राष्ट्रकुल स्पर्धेत १३ पदके, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली असून, पॅरिस ऑलिम्पिकसाठी तो पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘अर्जुन’ पुरस्कार विजेत्यांना अर्जुनाचा कांस्यधातूचा पुतळा, मानपत्र आणि रोख १५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सोहळय़ात प्रथम खेलरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यानंतर द्रोणाचार्य आणि अखेरीस अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार सोहळय़ास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते.