आज दि.१ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘राज्यपालांना हटवा ‘, मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वेगवेगळ्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे राज्यपालांना हटवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.राज्यपालांना हटवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कांदिवलीतील रहिवासी दीपक जगदेव यांची वकील नितीन सातपुतेंमार्फत राज्यपालांविरोधात हायकोर्टात याचिका केली. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सकाळी ही याचिका सादर झाली.पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात दाखल याचिकेवर तातडीची सुनावणी घ्यायला मुख्य न्यायाधीशांनी नकार दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते ? राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखलं जाऊ शकते का? असा सवाल न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केला.

कानडी पोरांनी कन्नड रक्षक वेदिकेचा फडकावला झेंडा, मराठी मुलांनी धू धू धुतलं

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र बेळगाव सीमावादावर भाष्य केल्याने मागच्या काही दिवसांपासून जोरदार खडाजंगी सुरू आहे. अशातच बेळगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून पुन्हा सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. बेळगावातील गोगटे कॉलेजमध्ये कार्यक्रमात नाचताना एका मुलाने कन्नड झेंडा फडकवल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.  दरम्यान या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. सीमावाद पुन्ह पेटण्याची शक्यता आहे.

लता दीदींचा वर्ध्यात आहे जबरा फॅन, घरात उभारलंय मंदिर

पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी एका कलाप्रेमीला इतकी प्रेरणा मिळाली की, त्यांची मूर्ती आपल्या घरातील मंदिरात बसवून तिला देवाचे स्थान दिले. या कलाप्रेमीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. राजीव देशमुख असे त्यांचे नाव आहे. लहान पणापासूनच लता दीदींच्या गाण्यांचे ते मोठे फॅन आहेत. राजीव यांनी शालेय वयात ‘तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है’ हे गाणं गायलं, तेव्हा त्यांना पारितोषिक मिळालं होतं. तेव्हापासूनच ते लता दीदींच्या गाण्याचे मोठे चाहते झाले. 

वर्ध्यातील आर्वी येथील रहिवासी राजीव देशमुख 14 वर्षांचे होते, त्यावेळी ते लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांना शाळेचा ड्रेस आणि स्कूल बॅगसह पकडले. त्यावेळी त्यांना रेल्वे पोलीस ठाण्यात नेले होते. वाढत्या वयाबरोबर त्यांनी लता दीदींची गाणी गोळा केली. आयुष्यभर त्यांची गाणी गायली. एवढेच नाही तर लता दीदींच्या फोटोला लग्नपत्रिकेतही स्थान दिले होते. 

ग्रामपंचायत निवडणुकीची वेबसाईट हँग, निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची बातमी

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची घोषणा 9 नोव्हेंबर 2022 ला दिल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 28 नोव्हेंबर पासून निवडणूकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्वच इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रावण’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात राजकीय चिखलफेक सुरु होती. खरगे यांच्या मोदींवरील उपहासात्मक टिप्पणीमुळे भाजपाच्या हाती आयते कोलीत मिळाले होते. तसेच, ‘गुजराती अस्मिते’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन भाजपा नेते करत आहेत.‘तुम्ही १०० तोंडांचे रावण आहात का?’ असा खोचक प्रश्न खरगे यांनी अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे प्रचारसभेत विचारला होता. “मोदी सगळीकडे दिसतात, महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळ्याच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का?,” असा सवाल खरगे यांनी केला होता.

केजरीवाल यांच्या रॅलीत आपच्या आमदारांचेच मोबाईल लंपास

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या प्रचारसभांमधून सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यापाठोपाठ आता दिल्लीमधे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अरविंद केजरीवाल सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. हीच प्रतिष्ठा जपण्यासाठी केजरीवाल या निवडणुकीत दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले असून आपचा जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या अशाच एका रॅलीमध्ये प्रत्यक्ष आपचे नेते आणि काही आमदारांचेच मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बांगलादेशला मोठा धक्का; तस्किन अहमद भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे (IND vs BAN). या मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी यजमान बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे.विशेष म्हणजे, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद पाठदुखीमुळे पहिल्याच सामन्यातून बाहेर पडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुत अबेदिन यांनी क्रिकबझला ही माहिती दिली. बीसीबीचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल आबेदीन यांनी गुरुवारी क्रिकबझला सांगितले की, “पाठदुखीमुळे तस्किनला वनडेच्या पहिल्या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. “त्याच्या सहभागाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्याची प्रगती पाहणार आहोत,” असेही ते म्हणाले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.