sdnewsonline मध्ये आपण सर्वांचे स्वागत…!
नमस्कार
महाराष्ट्रातही कडक लॉकडाउन
होण्याची शक्यता
राज्यात १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली असली, तरी कोरोनाच्या रुग्णवाढीला अद्यापही अंकुश लागलेला नाही. दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठी वाढच होत आहे. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाल्यानं केजरीवाल सरकारने ६ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. आता दिल्लीपाठापोठ महाराष्ट्रातही लॉकडाउन होण्याची शक्यता वाढली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील, असं वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
उद्धव ठाकरेंनी पीपीई
किट घालून बाहेर पडावं
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीका केली. “सगळं केंद्रावर फाडून मोकळं व्हायचं. रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र. ऑक्सिजन केंद्र. मग तुम्ही काय करता ? गुजरातने नवीन युनिट उभं केलं आणि ते चार दिवसांवर आणलं. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन निर्मितीची केंद्र सुरू झाली. महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार ? प्रत्येकवेळी केंद्राकडे… तुमचं काय कर्तृत्व आहे ? उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावं आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात,” असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला.
दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्रीपासून ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करुन सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यपाल आणि ठाकरे सरकार
यांच्यातील संवाद पुन्हा सुरु
काही दिवसांपूर्वी सरकारी विमान नाकारल्यावरून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये निर्माण झालेले वितुष्ट आता संपुष्टात आल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
किराणा दुकान 7 ते 11
वेळेत सुरू राहणार
किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. किराणा दुकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सामाजिक संस्थांनी कोविड
सेंटर निर्माण करावे : शरद पवार
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्थांना केलं. नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ब्रिटनचे पंतप्रधान जॉनसन
यांचा भारत दौरा रद्द
भारतात कोरोना रुग्णांचा विस्फोट पाहता इतर देशांनी धसका घेतला आहे. कोरोना स्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. या आठवड्यात ते भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र कोरोनाचा प्रकोप पाहता त्यांनी नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कुंभमेळा व्हायला
नको होता : सोनू निगम
सोनू निगमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, कोरोनाच्या काळात कुंभमेळा आयोजित करायला नको होता, असं म्हटलं आहे. “मी दुसऱ्यांविषयी काही म्हणू शकत नाही. पण, एक हिंदू म्हणून हे निश्चितच सांगू शकतो की, कुंभमेळा व्हायला नको होता. असो चांगलं झालं थोडी सुबुद्धी झाली आणि याला प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलं. मी श्रद्धा समजू शकतो. पण, मला वाटतं सध्या लोकांच्या जिवांपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीही नाही,”.
परिस्थितीनुसार राज्यांनी
निर्णय घ्यावे : अमित शाह
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना निर्बंध लादण्याचे अधिकार राज्यांच्या हातात देण्यात आले आहेत. कारण, प्रत्येक राज्यातील परिस्थिती एकसारखी नाही. त्यामुळे प्रत्येक राज्याला तेथील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी देशात पहिल्यांदा लॉकाडऊन लागला तेव्हा आरोग्य यंत्रणा दुबळी होती. गेल्या वर्षभरात केंद्र आणि राज्य सरकारने बरीच तयारी केली आहे. त्यामुळे यंदा लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांचे अधिकार घेण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकार त्यांना पूर्णपणे मदत करेल, असेही अमित शाह यांनी सांगितले.
राज्य सरकारचे केंद्रावर
खोडसाळ आरोप : आठवले
रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना टीका केली आहे. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्यांना
निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
SD Social Media
9850 60 3590