गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून, आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते गुजरातमधील धोराजी इथे बोलत होते. दरम्यान त्यांनी यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्यावर देखील निशाणा साधला. तीन दशकं नर्मदा प्रकल्प ज्यांच्यामुळे रखडला त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या, मग काँग्रेस कोणत्या नैतिक आधारावर गुजरातमध्ये मत मागत आहे असा सवाल त्यंनी यावेळी केला.
प्रकल्पाला ज्यांनी विरोध केला ते ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये
पुढं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडला कारण त्याला अनेकांनी विरोध केला. कच्छ आणि काठियावाड सारख्या प्रदेशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सरदार धरण हा एकमेव उपाय आहे. मात्र या प्रकल्पाला ज्यांनी विरोध केला, कायदेशीर अडथळे निर्माण केले ते काल काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. मग काँग्रेसला गुजरातमध्ये मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
‘त्यांनी गुजरातला बदनाम केलं’
नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या प्रदेशाला पाणी मिळू नये याच्यासाठी आंदोलन केलं. त्यांनी गुजरातला इतक बदनाम केलं की, जागतिक बँकेने देखील या प्रकल्पाला आर्थिक मदत करणं थांबवलं होतं. जेव्हा आता काँग्रेस तुमच्या घरी मत मागण्यासाठी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न आवश्य करा की ते कोणत्या नैतिक आधारावर तुम्हाला मत मागत आहेत.