श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. वृत्तानुसार, आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले आहे की, त्याने दिल्लीतील एका तलावात श्रद्धाचे शीर फेकले. यानंतर दिल्ली पोलीस रविवारी संध्याकाळी छतरपूर जिल्ह्यातील मैदान गढी येथे पोहोचले. येथे असलेला तलावातील पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
काही वेळापूर्वी पोलिसांनी आफताबला येथे आणले होते, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या तलावात आपणच श्रद्धाचे शीर फेकल्याची कबुली त्याने दिली आहे. खुनाचे हत्यारही गायब आहे. छतरपूर जिल्ह्यातील मेहरौली जंगलातून पोलिसांनी आतापर्यंत 17 हाडे जप्त केली आहेत, ती तपासासाठी पाठवली जातील. त्याचबरोबर आफताबची सोमवारी नार्को टेस्टही होऊ शकते. यासाठी पोलिसांनी 40 प्रश्नांची यादी तयार केली आहे. तत्पूर्वी, श्रद्धाच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्यासाठी रविवारी सकाळी दिल्ली पोलीस आफताबच्या घरी गेले होते.
श्रद्धा हत्याकांडावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टीने पोलीस तपासात पूर्णपणे गुंतले आहेत. एक दिवसापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहरौली येथील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे काही फुटेज मिळाले आहेत, जे 18 ऑक्टोबरचे आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब हातात काही सामान घेऊन तीनवेळा घरातून बाहेर पडताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता आफताबने सांगितले की, 18 ऑक्टोबरलाच फ्रिजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे त्याने फेकले होते. आफताबने पोलिसांसमोर दिलेल्या जबानीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत असे.
आफताबला 12 नोव्हेंबरला अटक
दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. श्रद्धाचे शरीराच्या तुकड्यांची तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात विल्हेवाट लावत होता.