शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आता दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यावी, असा पेच मुंबई महापालिका प्रशासनासमोर उभा आहे. अशातच आता महानगरपालिकेवरील दबाव वाढला आहे. शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी पालिकेकडे याबाबत लेखी उत्तर मागितलं आहे. आमचा अर्ज पहिला आहे त्यामुळे आम्हाला पहिलं प्राधान्य द्या , अशी मागणी शिवसैनिकांनी पालिकेकडे केली आहे.
शिवतीर्थवर आवाज कुणाचा यावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली आहे. खरी शिवसेना कुणाची? हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं विधी आणि न्याय विभागाकडे पालिकेने धाव घेतली आहे. मुंबई महापालिका शिवसेनेला याबाबत लेखी उत्तर देणार आहे. दोन्ही गट शिवतीर्थासाठी आग्रही आहेत. परंतु नेमकी कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घेण्यासाठी येत्या सोमवारी मुंबई महापालिकेने अंतिम निर्णय द्यावा, असं विभाग प्रमुख महेश सावंत यांनी म्हटलं आहे. तर नुकतंच झालेल्या बैठकीत शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानातच होणार, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
दरम्यान शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिवसेना आणि शिंदे गट करत आहे. शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास दोन्ही गटांनी पर्यायांचा शोध सुरु केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता.