शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यामुळे शिवतीर्थावर यंदा दसरा मेळावा कोण घेणार असा वाद निर्माण झाला आहे. मनसेपाठोपाठ आता या वादात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. यंदाचा दसरा मेळावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं वक्तव्य करून राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा वादात अडकला आहे. एकीकडे मुंबई पालिकेनं अजूनही परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाची बाजू घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: च्या कर्तुत्वावर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. दसरा मेळावा जर झाला तर तो एकनाथ शिंदे घेतील. जर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी नक्की येईल, असं नारायण राणे म्हणाले.
शिंदे आणि फडणवीस सरकार हे सत्तेवर आले आहे. हे पर्मनंट सरकार आहे. आधीचे कंत्राटी सरकार गणपती बाप्पाने खाली खेचले आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं अपमानित होऊन कुणालाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं नाही. उद्धव ठाकरे यांनी फक्त 3 तास मंत्रालयामध्ये काम केलं, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.
बाळासाहेबांच्या नावाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. आता तुम्ही निवृत्त झाला आहात, त्यामुळे तुम्हाला आता बोलण्याचा अधिकार नाही, टीका करण्याचा अधिकार नाही. आता घरी बसा. स्वत: च्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्धा लायकी नाही, अशी टीकाही राणेंनी केली.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत आहे. त्यांच्या या दौऱ्यावरही राणे यांनी टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने टीव टीव करत हा उंदीर महाराष्ट्रभर फिरत आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
राज्याचे विघ्न आता दूर झाले आहे. मागील अडीच वर्षांपासून राज्यावर संकट आले होते. आता शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. हे सरकार चांगले काम करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे लागू नका, ते एकदिवस सगळे काढतील, असा इशाराही राणेंनी शिवसेनेला दिला.