येणाऱ्या काही दिवसामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक धोकादायक असून मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, पुरेशी काळजी घेऊन नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे असेही खात्याने स्पष्ट केले आहे.
मार्च ते मे महिन्यात ओडिशा, झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसने अधिक किं वा अत्याधिक असेल. हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, मार्च ते मे २०२१ मध्ये दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान व उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढणार आहे. तसेच हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, अरुणाचल, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, बिहार या प्रदेशांतही तापमान वाढणार आहे. दक्षिण भारतात तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही भागांत तापमान ०.५ अंश सेल्सिअसने अधिक राहील. दक्षिण आशियात तापमान अधिक वाढेल आणि २०२१च्या अखेरीस स्थिती आणखी गंभीर होईल, असे भारतातीलच नाही तर जागतिक हवामान खात्यानेही म्हटले आहे.
हे वर्ष अति तापमानाचे…
२०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक उष्णतेच्या लाटांची वर्षे ठरली आहेत. तसेच २०२१ हे वर्षसुद्धा अति तापमानाचे आणि उष्ण लाटेचे वर्ष ठरणार आहे. तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटेमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होऊन नैसर्गिक आपत्तीत वाढ होईल, अशी भीती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त के ली.