रंगपंचमीच्या रंगीत आठवणी

सर्व मित्रांना सर्वप्रथम रंगपंचमीच्या रंगीबेरंगी हार्दिक शुभेच्छा !!!

मित्रांनो सर्वांना आवडणारा, हवाहवासा वाटणारा सण, उत्सव म्हणजे होळी आणि रंग पंचमी.
या दोन्ही उत्सवाची वाट आपण पहात असतो. आज मी मागील दोन अडीच दशकापूर्वीची होळी-रंगपंचमीची आठवण करुन देत आहे.
धुळ्यातील होळी आणि रंगपंचमीचा सण हा महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर इतक्या उत्साहात, धामधुमीत आणि आनंदात साजरा केला जात नसावा, इतक्या जोरात तो साजरा केला जातो. होळीच्या आठ-दहा दिवस अगोदर तयारी केली जाते. म्हणजे प्रत्येक गल्लीत ,खुंटा खुंटावर मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या, कढाया, लोखंडी पिंप, ड्रम्स इ.जमा केले जातात. गल्लीत रंगीत पताका, केळीचे खांब ,तसेच तोरण बांधले जातात.तसचं होळीच्या आदल्या दिवशी गोव-या ,लाकडं आणि वर्गणी सुद्धा जमा केली जाते.त्याच दिवशी सायंकाळी होळीची पूजा करुन नैवेद्य दाखवून होळी पेटविली जाते.
होळी पेटविल्यानंतर गल्लोगल्ली ढोलताशे, लाऊडस्पीकर्स,संबळ असे साग्रसंगीतात आबालवृद्धांसह तरुण मंडळी होळीच्या गाण्यांवर नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतात. त्यावेळी आता सारखी कर्णकर्कश आवाज करणारे डिजे उपलब्ध नव्हते. आता गल्लोगल्लीत पाण्याचा शॉवर लावण्याचा प्रघात आहे. त्यामुळे रेनडान्सचा चांगला आनंद घेता येतो.
शहरात होळीच्या दिवसापासून तर दुस-या दिवशी रंगपंचमीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु असायचा.शहरात ठिकठिकाणी सहा इंच व्यासाचे लोखंडी पाईप स्टँड पोस्ट आज सुद्धा निदर्शनास येतात. त्यावेळी रंगपंचमी आणि होळीच्या सायंकाळ पर्यंत पाणी भरणेसाठी नगरपालिकाकडून पाणी पुरवठा केला जायचा. सध्या पाणी पुरवठा ब-याच वर्षा पासून बंद केला आहे.
त्याकाळी व्यायाम शाळा किंवा मित्र मंडळ इ.बैलगाडीतून यायचे. बैलगाडीला चार केळीच्या मोठ्या खांबांनी बांधून तसचं पताका वगैरे लावून सजवून पुढील दर्शनी भागावर व्यायामशाळेचा किंवा मित्रमंडळाचा मोठा बोर्ड लावलेला असायचा. बैलगाडीवर चार मोठे लोखंडी ड्रम्स रंगीत पाण्याने भरलेले असायचे. बैलगाडीवर चार -पाच मित्र, पहेलवान असायचे. त्यांचा अवतार म्हणजे नेहरु सदरा, सलवार, डोक्यावर जरीची टोपी, कानात डूल किंवा मोठ्या रिंगा, गळ्यात मण्यांची माळ, अन् हातात मोठी पितळी पिचकारी किंवा मोठी डोलची. असा साजशृंगार करुन ही मंडळी गल्ली नंबर सहा येथून तर काही मंडळी मनोहर कडून सरळ आग्रारोडने यायचे.
चैनीरोडवरुन पाचकंदील मार्गे वळसा घालून आग्रारोड, महात्मा गांधी पुतळा,नगरपट्टी असा प्रवास असायचा,आणि त्याच उत्साहात गल्लीगल्लीतील सर्व मंडळी बैलगाडीवरील मित्रांचा रंगीत पाण्याच्या माराने मुकाबला करायचे. म्हणजे डोलची किंवा पिचकारीच्या पाण्याने मारायचे.
असा सिलसिला सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असायचा. तसचं बैलगाडी व्यतिरिक्त गल्लीतील मंडळी नाचण्याचा आणि पाण्याचा आनंद घ्यायची. काही मंडळी बेभान होऊन नाचायची ,काहींना अंगावरील कपड्यांचं सुद्धा भान नसायचं.
ज्या व्यक्तीने धुळ्यातील रंगपंचमीच्या दिवशी डोलचीचा (पाण्याचा ) मार (पाठीवर) खाल्ला असेल त्याची पाठ आठ दिवस दुखल्याशिवाय रहात नाही. त्या पाण्याचा रपका अगदी जोरात बसतो. आम्ही सुद्धा रंगपंचमीचा भरपूर आनंद घेतला आहे. आता फक्त राहिल्या आठवणी. पूर्वी सारखी रंगपंचमी आता होत नाही, याचं कारण म्हणजे दिवसेंदिवस होणारा पाण्याचा तुटवडा.

रंगपंचमी निमित्त एक कविता आठवते

रंगपंचमी

पिचकारीचे पाणी…
अन् रंगाची गाणी..
रंगपंचमीच्या सणाची
अशी अनोखी कहाणी
विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा
लहान मोठ्यांचा उत्साह कसा जगा वेगळा,.!

सुरेश थोरात…धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.