आज दि.२८ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मैदानात उतरताच विराट ठोकणार ‘शतक’, नावावर होणार हा मोठा विक्रम

भारत आणि पाकिस्तान संघातला महामुकाबला सुरु होण्यास आता फक्त काही क्षण उरले आहेत. आशिया चषकातल्या टीम इंडियाच्या या सालामीच्याच सामन्यात गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याच सामन्यात विराटच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. आजवरच्या कारकीर्दीत विराटनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आणि आज दुबईच्या मैदानात तो आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.

विराट कोहलीनं आतापर्यंत 99 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत-पाक संघांमधला सामना हा विराटच्या कारकीर्दीतला शंभरावा सामना ठरणार आहे. त्यामुळे आज दुबईच्या मैदानात उतरताच विराटच्या नावे एक नवा विक्रम जमा होईल. शंभर आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा विराट हा भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरणार आहे. विराटच्या आधी रोहित शर्मानं आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेले आहेत.

मदतीसाठी पोहोचलेल्या सैन्यावरच पूरग्रस्त नागरिकांचा हल्ला

पाकिस्तानच्या अनेक भागात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत, तर हजारो लोक मरण पावले आहेत. लोक घर सोडून इकडे तिकडे भटकत आहेत आणि निवारा शोधत आहेत. दरम्यान, पाकिस्तान सरकारने पूरग्रस्त भागात लोकांच्या सुटकेसाठी लष्कर पाठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी लष्करालाही लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे.

‘कुणी त्रास दिला तर…’ थोरातांच्या होमग्राऊंडमध्ये विखे पाटलांनी दिला थेट इशारा

मागच्या अडीच वर्षात केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरू होतं. महाराष्ट्रातले मंत्री काय भजे खात होते का? इतिहासात पहिल्यांदा एवढं मोठं भ्रष्टाचारी सरकार पाहिलं नाही, असं म्हणत भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसंच, तुम्हाला जर कुणी त्रास दिला तर मी समर्थ आहे, असं म्हणत विखेंनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.

नितीन गडकरींच्या मनातलं ओठावर आलच, म्हणाले गरज संपल्यावर फेकून देणे चूक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या जे मनात असते  ते बोलून रिकामे होतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असते. नितीन गडकरी पुन्हा आपल्या बोलण्याच्या शैलीने चर्चेत आले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी  भाजपने केंद्रीय संसदीय मंडळाची घोषणा केली. यामध्ये संसदीय मंडळामधून नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले. याची राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा झाली या अनुशंगाने नितीन गडकरी यांनी वक्तव्य केल्याची जोरदार रंगली आहे. 

ते म्हणाले कि, कोणाचा वापर करून त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका असे म्हणत त्यांनी सगळ्यांचाच समाचार घेतला. ते नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, कोणाचा वापर करून त्याला गरज संपल्यानंतर फेकून देणे चूक आहे.

कुठे उन्हाच्या झळा तर कुठे जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून माहिती

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. 28) दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे.तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी पावसाची उघडीप कायम आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.

आज (ता. 28) मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. विजांसह पावसाचा इशारा  सोलापूर, सांगली, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आला आहे.

शिंदें गटातील गुलाबराव पाटलांचं जनतेला खुलं चॅलेंज; …अन्यथा 9 व्या दिवशी मंत्रिपद सोडेन

शिंदे आणि ठाकरे गटातील तू तू मै मै काही जनतेसाठी नवीन राहिली नाही. अगदी पावसाळी अधिवेशनतील धक्काबुक्कीचा प्रसंग असो वा संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील कमी गर्दीमुळे झालेली टीका असो..वारंवार विविध कारणांवरुन दोन्ही गट एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहे.मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

फक्त राखेसाठी सारं काही, बीडमध्ये मोठा स्फोट घडवण्याचा कट उधळला

बीडमध्ये आज सकाळी स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटीनच्या काड्या आणि अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींनी राखेसाठी स्फोटाचा प्लॅन आखला होता. विशेष म्हणजे ज्या भागात स्फोट घडवून आणला जात होता त्या परिसराजवळच विद्यूत केंद्र आहे. त्यामुळे कदाचित फार मोठा विध्वंस होण्याचा धोका होता. अखेर स्फोट होण्याआधीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ट्विन टॉवर कोसळल्यानंतर भयंकर परिणाम समोर! आजूबाजूच्या घरांच्या काचांचा चुराडा

नोएडामध्ये रविवारी दुपारी 2.30 वाजता सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडण्यात आले. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशात उठल्याने दिवसाही अंधार झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटाचा आवाज 10 किलोमीटरपर्यंत ऐकू आला, तर घरांच्या फरशाही तुटल्या आहेत. घरातील पंखे थरथरले. सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर आजूबाजूचा परिसर धुळीच्या ढगांनी व्यापला होता. साचलेल्या धुळीची विल्हेवाट लावण्यासाठी अँटी स्मॉग गनचा वापर केला जात आहे. आज संपूर्ण घर धुळीने माखले आहे हे स्वप्नवत असल्याचे पार्श्वनाथ सोसायटीतील लोकांचे म्हणणे आहे.

अखेर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार! 17 ऑक्टोबरला निवडणूक

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता अध्यक्ष गांधी कुटुंबातील होणार की बाहेरचा याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सांगली : २०० वर्षांचा परंपरा असलेल्या चोर गणपतीचे पहाटे आगमन

सांगलीतील गणपती पंचायतन संस्थानच्या  चोर गणपतीचे रविवारी  पहाटे आगमन झाले. भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होत असताना मंदिरामध्ये तत्पुर्वीच या गणेशाचे आगमन होत असल्याने या गणपतीला चोर गणपती असे  म्हटले जाते.भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणार्‍या या चोर गणपतीला २०० वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची  प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस अगोदर प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.  

 ‘आजचा सामना कोण जिंकणार?’ भारत-पाक सामन्यापूर्वी कपिल देव यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आज भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी हा सामना कोण जिंकणार यासंदर्भात एक भाकीत केलं आहे. आकडेवारी बघिततली तर भारतीय संघाचे पारडे जड आहे. मात्र, टी-२० सामन्यामध्ये जो संघ चांगली कामगिरी करतो, तो जिंकतो, असे ते म्हणाले.

काय म्हणाले कपिल देव?

“तुम्ही क्रिकेटमध्ये निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. एकदा तुम्ही वनडे आणि कसोटी क्रिकटमध्ये भाकीत करू शकता, मात्र, टी-२० मध्ये हे सांगणं कठीण आहे. गेल्या वर्षी विश्वचषकात झालेल्या पराभवानंतर आता बरचं काही बदललं आहे. भारतीय संघ आधीपेक्षा मजबूत दिसतो आहे. आकडेवारी बघितली तर भारतीय संघाचे पारडे जड आहे. मात्र, टी-२० सामन्यामध्ये जो संघ मैदानात चांगली कामगिरी करेल तो जिंकेल”, असे ते म्हणाले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.