प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश, कोर्टाचा मोठा निर्णय

उद्योगपती अविनाश भोसले यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अविनाश भोसले यांना गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काल त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर एक महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे. मुंबई सेशन कोर्टातील विशेष CBI कोर्टाने उद्योगपती अविनाश भोसले यांना 30 मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार अविनाश भोसले यांना सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. या गेस्टहाऊसमध्ये अविनाश भोसले यांना त्यांचे वकील आणि परीवारातील एक सदस्यच भेटू शकणार आहेत.

कोर्टाच्या आदेशानंतर आता अविनाश भोसलेंची नजरकैदेत रवानगी करण्यात आली आहे. अविनाश भोसलेंना सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या वकिलांना दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान त्यांना भेटू देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचं मानलं जातं. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचं मोठं नाव आहे. देशभरात यांची कंपनी बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.