पंजाब ‘एटीएस’ची कारवाई
अमृतसर (पंजाब) येथे पोलीस उपनिरीक्षकाचे वाहन स्फोटकांद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित गुन्हेगारास केंद्रीय गुप्तचर विभाग, पंजाब पोलीस व स्थानिक पोलिसांनी मोहीम राबवत शिर्डीतील एका हॉटेलमधून शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. या आरोपीला पंजाब पोलिसांच्या पथकाने शनिवारी विमानमार्गे पंजाबला नेले.
राजिंदरकुमार राजकुमार बेदी( जि. तरंगतारंग, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमृतसर येथील रणजित एवेन्यू पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध स्फोटक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. तो पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा हॅण्डलर असल्याचा व त्याला कॅनडातून निधी पुरवठा होत असल्याचा पंजाब पोलिसांचा संशय आहे.
अमृतसर येथे राजिंदरकुमार, त्याचे साथीदार हरपाल सिंग, फत्यदीपसिंग या आरोपींनी पंजाबमधील पोलिस उपनिरीक्षक दिलबाग सिंग यांच्या चारचाकी गाडीखाली १४ फेब्रुवारी २०२२ रोजी बॉम्ब ठेवून नंतर फरार झाले होते. यातील राजिंदर हा आरोपी मालदीव देशात विमानाने जाण्यासाठी निघाला होता. परंतु त्याचा करोना चाचणी अहवाल नसल्याने विमानाचे तिकीट मिळाले नाही. तो दिल्ली येथून ‘मंगला एक्सप्रेस’ रेल्वेने नांदेड येथे जाण्यासाठी निघाला. परंतु ही रेल्वे नांदेडला न जाता मनमाडपर्यंत असल्याने तो मनमाड स्थानकावर उतरला. तेथे त्याने एका लॉजवर एक दिवस मुक्काम केला. सकाळी एका दुकानातून दोन सिमकार्ड व एक छोटा मोबाईल घेतला. त्यानंतर तो टॅक्सीने शिर्डीत आला. शिर्डीतील हॉटेल गंगा कॉन्टीनेंटलह्ण येथे थांबला. त्यानंतर तो दर्शनासाठी साई मंदिरात गेला. दुपारी दीडच्या सुमारास तो दर्शन करून हॉटेलवर परत आला. याच दरम्यान त्याने मित्राला फोन केल्यानंतर तो पंजाब पोलिसांच्या जाळय़ात अडकला. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाचे (आयबी) पुणे येथील पथक व स्थानिक पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले.
गुन्हेगार आश्रयाला..
देशातील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिराची सुरक्षा नेहमीच सतर्क असते. मंदिराला दहशतवाद्यांचा धोका असल्याचेही वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. त्यामुळे मंदिर व परिसरात पोलीस तसेच ‘क्युआरटी’ पथकाची सुरक्षा असतानाही पंजाबमधील हा संशयित खलिस्तानवादी आरोपी शुक्रवारी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुन्हा लॉजकडे जातो, तरीही त्याचा थांगपत्ताही शिर्डी पोलीस, मंदिर सुरक्षा व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना का लागला नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिर्डीत गुन्हेगारांचे वास्तव्य असते. या गुन्हेगारांना परराज्यातील पोलीस घेऊन जातात नंतरच त्याची माहिती स्थानिक पोलिसांना कळते. गुन्हेगार लॉज, हॉटेलमध्ये खोल्या घेऊन राहतात, त्याची खातरजमा हॉटेल आणि लॉजचालक करत नाहीत.
भ्रमणध्वनी चालू करताच शोध..
राजिंदर बेदी हा आरोपी शिर्डीत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी त्याचा भ्रमणध्वनी चालू झाल्यावर मिळताच त्यांनी ही माहिती राज्य दहशतवादी पथक तसेच गुप्तचर यंत्रणेला दिली. नंतर त्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना देताच राजिंदरला शिर्डीतील हॉटेलमधून ताब्यात घेऊन पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अटक केलेला राजिंदर बेदी हा खलिस्तानवादी असल्याचा संशय आहे. राज्याचे एटीएस पथक व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर शिर्डीतील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. नंतर त्याची माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली. आज येथे आलेल्या पंजाब पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पंजाब पोलीस त्याला विमानमार्गे घेऊन गेले. पंजाबमधील पोलीस उपनिरीक्षकाचे वाहन स्फोटकांद्वारे उडून देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुध्द दाखल आहे.