बँकेकडून कर्ज घ्यायचं म्हटलं की बँका पहिले तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करतात. जेणेकरुन कर्ज घेणाऱ्याची पैसे फेडण्याची क्षमता किंवा इतर व्यवहारांची माहिती बँकेला मिळते. त्यामुळेच चांगला क्रेडिट स्कोअर कर्ज मिळवण्यात मोठी भूमिका बजावतो. जोपर्यंत तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तोपर्यंत तुम्ही खूप प्रयत्न करूनही कर्ज मिळणार नाही. पण तुमच्या चुकीमुळेच तुमचा क्रेडिट स्कोअर बिघडला असेल असे नाही. कधीकधी क्रेडिट स्कोअर जारी करणाऱ्यांकडूनही चूक होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्याकडे क्रेडिट स्कोअर ब्युरोशी संपर्क साधण्याचा पर्याय आहे. पण जर त्यांनी तुमचे म्हणणे ऐकले नाही तर तुम्ही कुठे जाल?
यावर रिझर्व्ह बँकेने तोडगा काढला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, जर क्रेडिट स्कोअर ब्युरो तुमचे म्हणणे ऐकत नसेल तर तुम्ही थेट आरबीआयकडेच तक्रार करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने जाहीर केले आहे की CIBIL, Experian, Equifax इत्यादी क्रेडिट माहिती कंपन्यांमध्ये समस्या असलेल्या व्यक्ती थेट रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतात.
क्रेडिट ब्युरोने 30 दिवसांत चूक सुधारली नाही, तर RBIशी संपर्क साधा
क्रेडिट माहिती देणाऱ्या कंपन्या, ज्यांना सामान्यतः क्रेडिट ब्यूरो म्हणतात, बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांकडून ग्राहकांचा डेटा गोळा करतात. या डेटाच्या आधारे, ते एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर जारी करतात. या आधारावर एखादी व्यक्ती चांगली कर्जदार किंवा वाईट कर्जदार आहे हे कळते. मात्र असे होऊ शकते की क्रेडिट ब्युरोकडे उपलब्ध माहिती चुकीची आहे आणि परिणामी चुकीचा क्रेडिट स्कोर जारी केला जातो. जर क्रेडिट ब्युरोने 30 दिवसांच्या आत तुमची चूक सुधारली नाही तर तुम्ही थेट RBI कडे तक्रार करू शकता.