अचिंता शेऊलीचे सुवर्णयश ; पदार्पणातच अग्रस्थानी झेप; भारताचे वेटलिफ्टिंगमधील सहावे पदक

वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच सुवर्णयश संपादन करण्याची दमदार कामगिरी केली. त्याने ७३ किलो वजनी गटात भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुलमधील तिसरे सुवर्ण, वेटलिफ्टिंगमधील एकूण सहावे पदक मिळवले.

अचिंताला या वजनी गटात सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना स्नॅचमध्ये १४३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १७० किलो असे एकूण ३१३ किलो वजन उचलत सुवर्ण कामगिरी केली. मलेशियाच्या एरे हिदायत मुहम्मदने अचिंताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एरेला एकूण ३०३ किलो (१३८ आणि १६५ किलो) वजन उचलता आले. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शाद दारसिग्नने एकूण २९८ किलो (१३५ आणि १६३ किलो) वजनासह कांस्यपदक मिळवले.

कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अचिंताने स्नॅचमधील आपल्या तीन प्रयत्नांत अनुक्रमे १३७ किलो, १४० किलो आणि १४३ किलो वजन उचलले. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये कोलकाताच्या अचिंताने १६६ किलो वजनाने सुरुवात केली. त्याचा १७० किलोचा दुसरा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे वजन उचलत एकूण ३१३ किलो वजनासह राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक वजनाच्या विक्रमाची नोंद केली.

अजय सिंग चौथ्या स्थानी

भारताचा वेटलिफ्टिंगपटू अजय सिंगला पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात एकूण ३१९ किलो वजनासह चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याने स्नॅचमध्ये १४३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १७६ किलो वजन उचलले. या गटात इंग्लंडच्या ख्रिस मरेने एकूण ३२५ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.