सर्वोच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. ज्यानुसार, जर कोणा महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असेल आणि तिने जर दुसरं लग्न केलं तर पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला ती दुसऱ्या पतीचं नाव देऊ शकते.
ही घटना आंध्र प्रदेशातील आहे. येथे एका महिलेच्या पतीचा मृत्यू होतो. त्यावेळी त्यांचा मुलगा केवळ अडीच महिन्यांचा होता. यानंतर ती एअर फोर्समधील एका अधिकाऱ्यासोबत लग्न करते. आता प्रश्न हा होता की, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचं काय?
महिलेच्या पहिल्या पतीचे कुटुंबीय मुलाला स्वत:जवळ ठेवू इच्छित होते. याशिवाय ते नातवाला आपलं नाव लावू इच्छित होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, आजी-आजोबांपेक्षा आई मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. त्यामुळे मुलगा त्याची आई आणि तिच्या दुसऱ्या पतीसोबत राहील.
सर्वोच्च न्यायालयाने पुढे असंही सांगितलं की, मुलाला त्याच्या दुसऱ्या वडिलांचं नाव देता येऊ शकतं. हा महिलेचा अधिकार आहे. ज्यात ती आपल्या मुलाला दुसऱ्या पतीचं नाव देऊ शकते. यामुळे मुलगा आणि दुसऱ्या पती यांच्यामधील मुलं-वडिलांचं नातं चांगलं होईल. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितलं की, दुसरा पती मुलाला दत्तकही घेऊ शकतो.
सर्वोच्च आपल्या निर्णयात सांगितलं की, मुलाच्या सर्व कागदपत्रांमध्ये त्याच्या दुसऱ्या वडिलांचं नाव असेल. कागदपत्रांमध्ये पहिल्या पतीचं नाव असल्याने मुलाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहू शकतात. परिणामी हे मुलासाठी फायदेशीर ठरणार नाही.