बदलती जीवनशैली, पोषक आहार आणि व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा किंवा आनुवंशिकता यामुळे हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकार टाळण्यासाठी आहार आणि पुरेसा व्यायाम महत्त्वाचा ठरतो. हायपरटेन्शन अर्थात हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वेगात प्रवाहित होतं. यामुळे हृदयविकारासह अन्य गंभीर आजार होऊ शकतात. ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आहार, व्यायामासोबत वैद्यकीय उपचारही महत्त्वाचे असतात. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तीनं दिवसभरात पुरेसं पाणी गरजेचं आहे. शरीरात पुरेसं पाणी असेल तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं असं तज्ज्ञ सांगतात.
`डब्ल्यूएचओ`च्या म्हणण्यानुसार जगभरात 30 ते 79 वर्षं वयोगटातल्या 128 कोटी प्रौढ व्यक्ती हाय ब्लड प्रेशरने पीडित आहेत. त्यापैकी 46 टक्के जणांना आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे हे माहितीदेखील नाही. कारण त्यांना ब्लड प्रेशरशी संबंधित कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. परंतु, हा आजार जेव्हा धोकादायक पातळीवर पोहोचतो, तेव्हा त्याची लक्षणं दिसू लागतात. या लक्षणांमध्ये प्रामुख्याने हार्ट अॅटॅक, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक यांचा समावेश आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाला `सायलेंट किलर` असं म्हटलं जातं.
`डब्ल्यूएचओ`च्या म्हणण्यानुसार, हाय ब्लड प्रेशरच्या त्रासामागे जास्त मीठ, ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सयुक्त आहार, आहारात फळं आणि भाजीपाल्याचा कमी प्रमाणात समावेश, मर्यादित शारीरिक हालचाली, तंबाखू सेवन, मद्यपान आणि लठ्ठपणा या गोष्टी कारणीभूत आहेत. या गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. याशिवाय तुमच्या कुटुंबात हायपरटेन्शनची पार्श्वभूमी, 65 वर्षांपेक्षा अधिक वय, डायबेटीस, किडनी विकार किंवा अन्य आजारांमुळेही हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, हाय ब्लड प्रेशर टाळण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक आहे. त्यासाठी संतुलित आहार, मिठाचं कमी प्रमाणात सेवन, मद्यपान न करणं किंवा करत असल्यास ते नियंत्रित ठेवणं, रोज व्यायाम करणं, ताण-तणाव व्यवस्थापन, वजन नियंत्रणात ठेवणं आणि धूम्रपानापासून दूर राहणं गरजेचं आहे. याशिवाय भरपूर पाणी पिऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो, असं तज्ज्ञ सांगतात.
रोज किमान आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी रक्तातले विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं. तसंच पाण्यामुळे शरीरातलं अतिरिक्त सोडियम बाहेर टाकलं जातं. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्रॅनबेरी ज्यूस पिण्यानंदेखील हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतं. क्रॅनबेरी ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असतं. याशिवाय त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे इम्युन सिस्टीम लढते आणि बॅक्टेरिया नष्ट करते. त्यामुळे पाणी, तसंच क्रॅनबेरी ज्यूस या दोन्ही गोष्टींमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.