माईर्स एमआयटी’ या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी ज्येष्ठ कवयित्री, लेखिका उर्मिला कराड यांचे बुधवारी निधन झाले. त्या वय 79 वर्षांच्या होत्या. बुधवारी त्यांनी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पती, मुलगा डॉ. राहुल आणि चार मुली असा परिवार आहे.
संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास –
उर्मिला कराड यांना लहानपणापासून त्यांना काव्य लेखनाची आवड होती. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘समीर’ हा 1989 मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यांनी ‘अरे संसार संसार’, ‘अनुभूती’, ‘माझी माय दुधावरची साय’ यासह अनेक लोकप्रिय कवितासंग्रह त्यांनी लिहिले. संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
आज होणार अंत्यसंस्कार –
उर्मिला कराड यांचे पार्थिव परमहंसनगर, कोथरूडमधील ज्ञानमंदिर या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गुरुवारी 21 जुलैला सकाळी 9 ते 9.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 10.30 च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
लेखिका उर्मिला कराड यांनी त्यांचे पती डॉ. विश्वनाथ कराड यांना एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत मोलाची साथ दिली. मूळच्या नाशिकच्या असलेल्या उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. त्यांच्यावर संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता. उर्मिला कराड यांनी यासोबत कवयित्री व लेखिका म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.