फुटबॉल विश्वातल्या सर्वात मोठ्या स्पर्धेला कतारमध्ये सुरुवात झाली आहे. अरब देश कतार यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करतोय. कतारमधल्या अल बायत स्टेडियमवर दिमाखदार कार्यक्रमात फिफा वर्ल्ड कपचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सनं आणि BTS या जगप्रसिद्ध बँडनं चार चाँद लावले. त्यानंतर कतारचे शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी वर्ल्ड कप सुरु झाल्याची अधिकृत घोषणा केली. पुढचे 29 दिवस फुटबॉलचा महासोहळा कतारमध्ये रंगणार आहे. 18 डिसेंबरला या वर्ल्ड कपची मेगा फायनल पार पडेल.
फिफा वर्ल्ड कपच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात जगप्रसिद्ध बीटीएस बँडनं आपल्या धुनवर सर्वांना नाचण्यास भाग पाडलं. यावेळी गायक जुंग कुकनं धमाकेदार परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सवेळी स्टेडियममध्ये प्रेक्षक आपल्या जागेवर उभे राहून नाचत होते.
फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी स्टेडियममध्ये दाखल
याचदरम्यान फिफा वर्ल्ड कप विजेत्याला दिल्या जाणाऱ्या झळळत्या ट्रॉफीचं मैदानात आगमन झालं. फ्रान्सच्या 1998 च्या विश्वविजेत्या संघातले सदस्य मार्सेल डिसायली यांनी ही ट्रॉफी मैदानात आणली.
सेलिब्रेटींचे खास परफॉर्मन्स
उद्घाटनाच्या सुरुवातीला कतारमधलं वाळवंट दाखवण्यात आलं. स्टेडियममध्ये उंट दिसले. स्थानिक कलाकारांनी पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलं. याचवेळी हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मॉर्गन फ्रीमॅन यांनी आपली कला सादर केली.
उद्घाटनाची घोषणा
कार्यक्रम संपल्यानंतर कतारचे शेख तमीम बिन अहमद अल थानी यांनी अधिकृतपणे फिफा वर्ल्ड कप सुरु झाल्याची घोषणा केली. त्यांनी सगळ्या खेळाडूंचं, संघांचं आणि प्रेक्षकांचं स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भाषणानंतर उद्धाटनाचा हा कार्यक्रम संपला.