क्रिकेटच्या मैदानात रोज नवनवीन विक्रम घडत असतात. आजही आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या पात्रतेसाठी आफ्रिकनं देशांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत असाच एक मोठा विक्रम घडला. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळं अस्तित्व असणारी केनियाची टीम आज तळाला गेली आहे. पण याच टीमनं आज एक वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मालीविरुद्धचा सामना केनियानं अवघ्या 15 बॉलमध्ये संपवला आणि 10 विकेट्सनी दणदणीत विजय साजरा केला. टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बॉल बाकी ठेऊन जिंकलेला हा सामना ठरला.
मालीचा 30 धावात खुर्दा
या सामन्यात वेगवान गोलंदाज पीटर लँगाटच्या माऱ्यासमोर मालीची पूर्ण टीम 30 धावातच आटोपली. माली संघाला जेमतेम 10.4 ओव्हर्स खेळता आल्या. तर त्यांच्या सहा प्लेयर्सना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर 31 धावांचं लक्ष्य केनियाचा कॅप्टन कॉलिन्स ओबुया (18) आणि पुष्कर शर्मानं (14) 2.3 ओव्हर्समध्येच पूर्ण करत विक्रमी विजय मिळवला.
केनियानं मोडला ऑस्ट्रियाचा विक्रम
2019 साली ऑस्ट्रियानं तुर्कीचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. तेव्हा ऑस्ट्रियानं अवघ्या 16 बॉलमध्ये विजयी लक्ष्य गाठून 104 बॉल बाकी राखून विजय मिळवला होता. पण आज केनियानं ऑस्ट्रियाचा तो विक्रम मोडित काढला. केनियानं 105 बॉल बाकी ठेऊन हा सामना जिंकला.