कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना कोव्हिडच्या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास या कारणांमुळे लहान मुलं वेगाने बाधित होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती ?
- पोट बिघडणं
- उलट्या होणं
- डोकेदुखी
- बेशुद्ध पडणं
- सतत चिडचिड करणं
- अंगावर पुरळ येणं
- डोळे लाल होणं
- हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं
- ताप
- कोरडा खोकला, घसा खवखवणं
- धाप लागणं
- तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.