आज दि. १८ एप्रिल २०२१ च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा

sdnewsonline मध्ये आपण सर्वांचे स्वागत….!

नमस्कार

कोरोनाची दुसरी लाट
लवकर ओसरणार

कोरोनाची ही दुसरी लाट ओसरणार असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत दुसरी लाट ओसरण्याची शक्यता एका संशोधनाद्वारे वर्तविण्यात आली आहे. ‘क्रेडिट सुसे’ या संस्थेने यासंदर्भात संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, कोरोनाची दुसरी लाट जेवढ्या वेगाने वाढली, तेवढ्याच वेगाने ती ओसरू लागेल, असा अंदाज आहे. तसेच संशोधनात असेही म्हटले आहे, की गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशातील २१ टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडी विकसित झाले होते. तर एप्रिलमध्ये हा आकडा सुमारे ४० टक्क्यांपर्यंत जण्याची शक्यता आहे.

राज्यात दररोज 8 लाख
लसीकरणाचे उद्दिष्ट : राजेश टोपे

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

रेल्वे मार्फत ऑक्सिजन
पोहोचवीले जाणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पोहोचवून रेल्वे शेकडो जणांचा जीव वाचवण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे. क्रायोजेनिक टँकरना वैद्यकीय वापरासाठी द्रव्य ऑक्सिजनच्या परिवहनाला रेल्वेने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने विनंती केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध स्थानकांपर्यंत द्रव्य स्वरूपातील ऑक्सिजनला रोल ऑन रोल ऑफ सेवेअंतर्गत पोहोचवण्यात येणार आहे, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. याचा खर्च राज्य सरकारलाच करावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालय
कर्मचारी , डॉक्टरांनी वाचविले १६८ जणांना

ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता मुंबई महापालिकेच्या वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकाका रुग्णालयातून रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात हलविण्यास सुरुवात केली. रात्री नऊ ते पहाटे साडेचारपर्यंत तब्बल १६८ रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयांत सुखरुप पोहोचवले. या मोहिमेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अधिष्ठाते, डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंत सर्वांच्या हालचाली लष्कराच्या एखाद्या गतिमान कारवाईसारख्या झाल्या.

राहुल गांधी यांच्या कृतीचे
सोशल मीडियावर कौतुक

राहुल गांधी यांनी शहाणपणाचे दर्शन घडवित पश्चिम बंगालमधील त्यांच्या नियोजत सर्व रॅली आणि सभा रद्द केल्या आहेत. तर, दुसरीकडे भाजप नेते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढत आहेत. या सर्वाचे मोठे पडसाद सोशल मिडियात उमटत आहेत. नागरिकांच्या आरोग्य हित लक्षात घेता मी रॅली आणि सभांना जाणार नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. तर, भाजप नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रचार करीत असल्याची टीका सोशल मिडियात होत आहे. राहुल गांधी यांनी शहाणपणा दाखविला आहे, भाजप नेते तो कधी दाखविणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोरोना काळातही चीनची
अर्थव्यवस्था बळकट

कोरोना विषाणूच्या साथीमुळे एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था ढासळत असताना दुसरीकडे चीनने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत १८.३ टक्के वाढ नोंदविली आहे. चीनच्या संख्याशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीने अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढ दर्शविली आहे. गेल्या वर्षात म्हणजे २०२० च्या पहिल्या तिमाहीत कोरोनामुळे चीनमध्ये देशव्यापी लॉकडाऊनमुळे चीनी अर्थव्यवस्था ६.८ टक्क्यांवर आली आहे. पण यंदा मात्र १९९२ पासून प्रथम चीनच्या जीडीपीमधील ही सर्वात मोठी उडी आहे. मार्चमध्ये औद्योगिक उत्पादनात १४.१ टक्के वाढ झाली, तर किरकोळ विक्रीत ३४.२ टक्के वाढ झाली.

आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांना
5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत

गरिबांना उपचारासाठी खर्च करण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली. ज्या अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. यासाठी त्यांना आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. हे कार्ड तयार करण्यासाठी आधी 30 रुपये शुल्क भरावे लागले. परंतु कोरोना काळात मोदी सरकारने यासंदर्भात जनतेला मोठा दिलासा दिलाय. आता कोणतीही व्यक्ती आयुष्मान भारत कार्ड पूर्णपणे विनामूल्य मिळवू शकते आणि उपचारासाठी आर्थिक लाभ घेऊ शकते.

गंगा नदीत स्नानामुळे
कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका

गंगा नदीत स्नानामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गंगा नदीच्या खोर्यात महामारीने घेतलेल्या विक्राळ रूपाने तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. आगामी १५ दिवसांत गंगा नदीत स्नान न करण्याचे आवाहन गंगा नदी विकास आणि जलसंधारण व्यवस्थापन संशोधन केंद्राचे अध्यक्ष महामना मालवयी आणि नदीचे अभ्यासक बी. डी. त्रिपाठी यांनी केले आहे. गंगा नदीच्या खोर्यात स्नानापासून भाविकांना परावृत्त करावे, अशा आशयाचे पत्र त्यांनी नमामि गंगे योजनेच्या अधिकार्यांना लिहिले आहे. तसेच गंगेच्या पाण्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येण्याबाबतचे संशोधन अहवालही पूर्ण झालेला नाही, असे त्रिपाठी यांनी सांगितले आहे.

अनेकांना वाचवणाऱ्या डॉक्टर
पिता पुत्रांचा कोरोनानेच मृत्यू

कोरोना काळात अनेक रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टर पिता पुत्रांचा कोरोनानेच जीव घेतला आहे. अवघ्या दोन दिवसाच्या अंतरानं मिश्रा कुटुंबानं दोन कर्तेधर्ते पुरुष गमावले आहेत. डॉ. नागेंद्र मिश्रा यांचं टिटवाळ्यातल्या खडवली भागात गेल्या 22 वर्षांपासून क्लिनिक होतं. याच क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ रुग्णांची सेवा केली. त्यांचा मुलगा डॉ. सुरज मिश्रा यांचं भिवंडीच्या बापगावात क्लिनिक आहे. अनेक वेळेस त्यांनी मोफत उपचार केले. याच दरम्यान त्यांना कोरोनाने गाठलं.

सिलिंडर्सही होणार पारदर्शक

आपल्या घरी येत असलेले छोटे किंवा मोठे सिलिंडरमधील रंगाढंगात बदल होणार आहे. कारण आता हेवी सिलिंडरचा चेहरामोहराच बदलणार आहे. एवढेच नव्हे तर हे सिलिंडर्सही पारदर्शक होणार आहेत, जेणेकरून आपणास सिलिंडर संपलाय की नाही तेसुद्धा लगेच समजणार आहे. इंडियन ऑईलने स्वतःच नव्या काळातील सिलिंडरबद्दल माहिती दिलीय आणि हा सिलिंडर कसा असेल हे आपण फोटोमध्ये देखील पाहू शकता. या सिलिंडरमध्ये काय खास असेल आणि हे सिलिंडर इतर सिलिंडर्सपेक्षा कसे वेगळे असणार आहेत, याचीही माहिती घ्या.

आता नेटची परीक्षा लांबणीवर
टाकण्याची मागणी

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार आहे. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. दहावी, बारावी, सीबीएसई बोर्डानं परीक्षा रद केल्या आहेत. नेटची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

एकाच कुटुंबातील पाच
जणांचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.