कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज रुग्णवाढीचा वेग जोराने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.
पुण्यात कडक निर्बंध
पुण्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतली दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. अपवाद फक्त मेडिकलची दुकानं असतील. पुण्यात काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवत दुकानं सुरु ठेवली होती.