आज दि.१८ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्र सोमवारी चमत्कार
बघेल : अजित पवार

राज्याची विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून, २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली. तसेच, चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल, असं विधानही यावेळी त्यांनी केलं. आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचंही बोलून दाखवलं.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना
जीवे मारण्याची धमकी

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत लवकरच तुला मारले जाईल’ अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरुन देण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांची
अग्निपथ योजनेवरून टीका

केंद्रातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून अग्निपथ योजनेचं कौतुक होत असून अनेकजण पाठराखण करताना दिसत आहेत. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार तरुणांची टिंगलटवाळी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. “उमेदीचे चार वर्षे तरुणांनी तुमच्यासोबत काम करायचं. त्यानंतर तुम्ही त्यांना सांगणार, आता तुम्ही बाहेर व्हा. अशा तरुणांनी पुढे काय करायचं?” असा सवाल विचारला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या
नावाने बनावट व्हॉटसॲप खाते

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते उघडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय ४२) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. सय्यदने सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते उघडले आणि काही राजकीय व्यक्तींसोबत नागरीकांना मेसेज केला होता.

युरिया खताची तस्करी
करणा-यांचा पर्दाफाश

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातून मध्यप्रदेशात युरिया खताची तस्करी करणा-यांचा पर्दाफाश करण्यात आला. बेनोडा पोलिसांनी ट्रक सह 240 खतांची पोती जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून ट्रक चालकाला अटक केली. 45 किलो वजनाच्या 240 युरिया खताची पोती जप्त करण्यात आली. राज्यात युरियाची टंचाई आहे, त्यामुळे खताला सध्या चांगलाच भाव आला आहे. यामुळे या तस्कराने खतांचा काळाबाजार सुरू केला.

देशातील मौसीनराम गावात पावसामुळे जगणं अवघड; गिनीज बुकमध्ये आहे नोंद

मान्सूनचं देशात आगमन झालं असून अनेक राज्यात पावसाने तुफान हजेरी लावली आहे. मेघालय राज्यातील मौसीनराम हे असे ठिकाण आहे, जे जगातील सर्वात पावसाळी ठिकाण मानले जाते. या जागेने नवा विक्रम केला. गुरुवारी, 16 जून रोजी सकाळी 8.30 वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरू होता. हा पाऊस इतका जबरदस्त होता की अवघ्या 24 तासात 1003.6 मिमी पाऊस पडला. याआधी, 16 जून 1995 रोजी एकाच दिवसात यापेक्षाही जोरदार 1563.3 मिली पाऊस चेरापुंजीत झाला होता.

गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी
तब्बल 3 किलो मीटरची पायपीट

देश कितीही प्रगतीची पावले चालला असला तरीही अद्याप ग्रामीण भागात सोयी सुविधा पोहोचवण्यात तो खुपच मागे आहे. कारण आजही अनेक ग्रामीण भागात लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही, गावापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आहे. या सर्व सोयीसुविधांपासून अजूनही ग्रामीण भाग वंचित आहे. त्यामुळे या नागरीकांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या घटनेत पाहा ना एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल 3 किलो मीटरची पायपीट करावी लागली. आधीच प्रसुतीच्या वेदना त्यात असुविधे अभावी होणारी वेदना वेगळीच. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडिया हळहळ व्यक्त होत असून प्रशासनावीर टीका होतेय.

प्राजक्ता माळीने सलग
घातले १०८ सुर्यनमस्कार

मराठीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. प्राजक्ताला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओ देखील ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आता देखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चक्क एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार करताना ती दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

100 झुरळं तीस दिवस सांभाळा
आणि दीड लाख रुपये जिंकण्याची संधी

आपलाच प्रोडक्ट किती दमदार आहे हे दाखवण्यासाठी कंपन्या काहीही करु शकतात. असा एक प्रकार नुकताच अमेरिकेतील एका किटकटनाशकांची फवारणी करणाऱ्या म्हणजेच पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीने केलाय. या कंपनीने ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये काही झुरळं ठेवण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये देण्याची विशेष ऑफर केलीय. अमेरिकेतील नॉर्थ कॅरलॉना येथील ‘द पेस्ट इन्फॉर्मर’ नावाच्या कंपनीने आपल्या ग्राहकांना ही दोन हजार अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिलीय. तुमच्या घरामध्ये आम्ही १०० झुरळं सोडणार त्या बदल्यात आम्ही दोन हजार अमेरिकन डॉलर्स देणार असं कंपनीकडून ग्राहकांना सांगितलं जात आहे.

टीम इंडियातून
मनीष पांडे बाहेर

मनीष पांडे एकेकाळी टीम इंडियाचे भविष्य मानलं जात होतं. मात्र त्याच्या खराब फॉर्ममुळे तो निवडकर्त्यांच्या डोळ्यात धूळफेक करू लागला आणि त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मनीष पांडे देशांतर्गत क्रिकेटमध्येही कमाल दाखवू शकलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या जागी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे मनीषचं टीम इंडियातील स्थान डळमळीत झालं.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.