दोन दिवसांपूर्वीच नागपूरमसह संपूर्ण विदर्भात मान्सूनचं आगमन झालं. मान्सून अमरावती,भंडारा, गोंदिया आणि नागपूर ग्रामीण मधील काही भागात सक्रीय झाला. पावसाची एन्ट्री होताच निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. वीज पडून 3 शेतकऱ्यांचा आणि बैलजोडीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वीज पडून 3 वेगवेगळ्या घटनांत 3 शेतकऱ्यांसह बैलजोडीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उपराजधानीत एकच शोक पसरलाय.
दुर्दैवी बाब अशी की, या तिघांपैकी दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं. एकाच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. तर दुसऱ्याच्या लग्नाला फक्त 5 महिने ओलांडले होते. नुकतीच या शेतकऱ्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती. मात्र नियतीला ते सुख पाहावलं नाही. अखेर या नवविवाहित वरांचं दुर्देवी निधन झालं.
शेतकरी आणि बैलजोडी यांचं नात शब्दात न मांडता येणार. मात्र एकाच वेळी शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी या घटना दुपारच्या सुमारास घडल्या. योगेश रमेश पाठे(वय 27), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (वय 34) आणि बाबाराव इंगळे(वय 60) अशी मृत शेतकऱ्यांची नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (18 जून) दुपारी नरखेड आणि काटोल तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. योगेश पाठे हा घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात पेरणी करीत होता.
लग्नाच्या दहाव्या दिवशी मृत्यू
पेरणी करताना पाऊस सुरु झाला. पाऊस सुरू झाल्याने योगेशने घरी जाण्याचं ठरवलं. त्यानुसार योगेश आपल्या बाईक जवळ पोहचला. मात्र तेवढ्यात वीज पडली आणि होत्याचं नव्हतं झालं. योगेशचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे दहा दिवसांपूर्वी लग्न झाले होते.
मुक्तापूर शिवारात पावसामुळे शेतातील झोपडीत दिनेश कामडी व बाबाराव इंगळे हे दोघेजण बसले होते. विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज झोपडीवर कोसळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक दिनेशचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दिनेशला नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ झाला होता. त्यामुळे दिनेश शेतातून अजून का आला नाही हे पाहण्यासाठी त्याचे वडील शेतात गेले. त्यावेळेस जे समोर पाहिलं ते पाहून दिनेशच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. दिनेश आणि बाबाराव या दोघांचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता.
तसेच पिंपळगाव शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून बैलजोडी दगावली. तर काटोल तालुक्यात मौजा कोहळा लाखोळी येथे सुद्धा सुखराम बिसादरे यांची गाय विज पडून मरण पावली.