राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि रेफर हॉस्पिटल म्हणून जालन्याला लागलेला डाग पुसून काढण्यासाठी या रुग्णालयाचा उपयोग होईल, अशी आशा राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे 100 खाटांच्या मेडिकॅब रुग्णालय उभारण्यात आलं आहे. तसेच नेत्र विभागाचेही नुतनीकरण करण्यात आलं आहे. काल मंगळवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं.
मास्टरकार्ड या कंपनीच्या अर्थसहाय्याने व अमेरिका-इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा 100 खाटांच्या मेडिकॅब हॉस्पिटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली आहे. मास्टरकार्ड कंपनीमार्फत संपूर्ण देशामध्ये अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात बारामती, अमरावती व जालना या तीन ठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे राज्यातील पहिल्या रुग्णालयाच्या शुभारंभ जालन्यात होत असल्याचा आनंद होत असल्याचे टोपे यांनी सांगितलं.
जालना ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण
जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार व चांगल्या पद्धतीच्या मिळाव्यात म्हणून आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जालना येथे कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात बेडची निर्मिती करण्याबरोबरच तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणात बेडस उपलब्ध करुन देण्यात आले. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यादृष्टीने लिक्विड ऑक्सिजन प्लँट, पीएसए प्लँटची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जालना जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.