कारखान्यातील बॉयलरचा स्फोट, 12 जणांचा मृत्यू; PM मोदींनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशातील हापूर मध्ये केमिकल फॅक्टरीत मोठी दुर्घटना घडली आहे. हापूर बॉयलर स्फोटात अनेक कामगार भाजले आहेत. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हापूरच्या धौलाना पोलीस स्टेशनच्या UPSIDC ची ही घटना आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे.

या अपघातात आतापर्यंत 12 मजुरांचे मृतदेह सापडल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह गंभीररित्या जळाले आहेत. कारखान्यात अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला.

त्याचवेळी आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, एका औद्योगिक युनिटमध्ये एक उपकरण कारखाना आहे, ज्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी अधिकृत केले गेले होते. फॉरेन्सिक आणि इतर पथके तपास करत आहेत. अपघातात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. हापूरच्या डीएम मेधा रुपम यांनी सांगितले की, हा इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचा कारखाना होता. पण आत काय चालले होते हा तपासाचा विषय आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी आहेत.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

त्याचवेळी पीएम मोदींनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएमओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधानांनी लिहिलं की, उत्तर प्रदेशातील हापूर येथील रासायनिक कारखान्यातील दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. यामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्यात राज्य सरकार सक्रिय आहे.

मुख्यमंत्री योगी यांनीही शोक व्यक्त केला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असे लिहिले आहे की, मुख्यमंत्र्यांनी हापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात बॉयलरच्या स्फोटात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.