जागतिक स्तरावर दरवर्षी नऊ दशलक्ष लोक सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. २००० सालापासून कार, ट्रक आणि उद्योगातील दूषित हवेमुळे मृत्यूची संख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत आणि चीन जगात आघाडीवर आहेत आणि या दोन्ही देशात वर्षांला अनुक्रमे २.४ दशलक्ष आणि २.२ दशलक्ष मृत्यू होतात. विशेष म्हणजे, या दोन देशांमध्ये जगातील सर्वात मोठी लोकसंख्यादेखील आहे.
‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मधील नवीन अभ्यासानुसार, युनायटेड स्टेट्स अव्वल दहा राष्ट्रांमध्ये एकमेव परिपूर्ण औद्योगिक देश आहे. तेथेही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे. बांग्लादेश आणि इथिओपिया हे दोन्ही देश २०१९ मध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या एक लाख ४२ हजार ८८३ मृत्यूंसह सातव्या क्रमांकावर आहेत. एकूण मृत्यूंपैकी तीन चतुर्थांश मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. कोळशावर आधारित वीज प्रकल्प, स्टील कारखाने यासारखे स्थिर स्त्रोत आणि कार, ट्रक व बस हेदेखील वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरले आहेत. ही एक मोठी जागतिक समस्या असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात नवी दिल्ली येथे हिवाळय़ात वायू प्रदूषण शिखरावर असते.
गेल्यावर्षी केवळ दोन दिवस दिल्ली शहरातील हवा प्रदूषित नव्हती. चार वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. वायू प्रदूषण हे दक्षिण आशियातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. वाहने आणि ऊर्जा निर्मितीतून विषारी वायूचे उत्सर्जन वाढत आहे, असा याचा अर्थ होतो, असेही या अभ्यासात नमूद आहे. तसेच गावखेडय़ांमध्येही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.