मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच सध्या राज्याच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी लागली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. पुढील एक ते दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. त्याचप्रमाणे देशातील पश्चिम-उत्तर, पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीनचार दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातून सध्या मोठय़ा प्रमाणावर वारे वाहत आहेत. त्याचप्रमाणे देशात अनेक भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात प्रामुख्याने बाष्पयुक्त वारे दाखल होत असल्याने या भागात पाऊस हजेरी लावतो आहे. गुरुवारी सोलापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद. चंद्रपूर, यवतमाळसह दक्षिण कोकणात काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला.
देशाच्या विविध भागातही सध्या जोरदार पाऊस पडत असून, पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीमसह पश्चिम बंगालमध्ये पुढील तीनचार दिवस पाऊस होणार आहे. उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत, तर दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पुढील तीनचार दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
र्नैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी (१८ मे) बंगालच्या उपसागरात पूर्वोत्तर दिशेने काही भागात प्रगती केली होती. त्यामुळे या भागासह अंदमान-निकोबार बेटांवर सध्या मोसमी पाऊस होतो आहे. गुरुवारी (१९ मे) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. १६ मे रोजी मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाल्यापासून बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील भागात त्याची प्रगती झालेली नाही. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत ते दक्षिण अरबी समुद्रात दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.