भुसावळ खाद्यभ्रमंती 14
जाळ अन् धूर संगटच.. भुसावळ म्हणा किंवा रेल्वे म्हणा ..अर्थ एकच..छोटसं तालुक्याचं गावं.. गावातील 75% जनता हि रेल्वेच्या चाकरीत..अवाढव्य अस डि.आर.एम.आँफिस त्यांचे अजुन सबआँफिस, आर. एम. एसचे आँफिस, रेल्वेचा मालवाहतुकीचा धक्का ( त्याला केला साय़डिंग असंही म्हणायचे), लोको शेड वगैरे .लोकोशेड म्हणजे स्टीम इंजिनांचे सर्व्हिस स्टेशनच ..आमचे वडील सांगतात, दिसला तरुण कि हे रेल्वेवाले धरायचे , मग तो चौथी पास असो कि आठवी .. दुस-या दिवसापासुन मुलगा हा रेल्वेचा दि मोस्ट ओबिडीयंट सर्व्हंट होवुन जायचा ,आमचं काँलेज संपल तेव्हा रेल्वे मंत्रालयाने हा धराधरीचा खेळ बहुतेक बंद केला व त्यामुळे एका होतकरुला रेल्वे मुकली ..हे त्यांच दुर्दैव..70-80 च्या या दशकात रेल्वेचे बहुतेक कर्मचारी घरी येतांना बरोबर दगडी कोळशाची पिशवी व तो नीट जळावा यासाठी वैस नावाचा कापुस म्हणता येईल असा प्रकार आणायचे.. वैस म्हणजे रेल्वे इंजीनाची साफसफाई , दुरुस्ती यामध्ये हात काळे व्हायचे म्हणुन रेल्वेच्याकर्मचा-यांना एक प्रकारचा कापुस पुरवायचे ,त्याला आँईल लागुन तो ब-यापैकी वंगणात रुपांतरीत झालेला असायचा, त्यावेळी एल.पी.जी गँस वगैरे याचा म्हणावा तितका प्रसार नव्हता.. त्यामुळे संध्याकाळी 4-5 च्या सुमारास, गल्लोगल्ली अगदी रांगेत कोळश्याच्या शेगड्या पेटलेल्या असायच्या. शेगडीच्या आत कोळसा भरुन त्यावर हा वैस नावाचा कापुस ठेवुन त्या शेगड्या पेटायच्या..राम मंदिर वाँर्ड, विठ्ठल मंदिर वार्ड , जुना ,नवा सातारा याठिकाणी जर यावेळेत चक्कर झालीच तर रेल्वेचे कोळशाचे इंजिन चुकून गल्ल्यांमध्ये शिरलय कि काय? असा भास व्हायचा. रेल्वेचे जंक्शन असलेले गाव , स्टिम इंजिन्सचा बोलबाला..त्यासाठी लागणारा दगडी कोळश्याचा रेल्वेचा स्वतंत्र असा प्रचंड साठा होता याशिवाय गावात वखारीही होत्या, तिथेही कोळसा मिळायचा, मग त्याचा काळा बाजार ,चो-यामा-यांचा सुळसुळाट…भुसावळच्या या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून पळणारे कोळसाचोर ( भुसावळकरांच्या भाषेत : ‘ कोयलाचोर ‘ ) व त्यांच्यामागे पळणारे रेल्वेचे (आर.पी.एफ.) चे जवान हे ,भुसावळकरांच्या अंगवळणी पडलेलं.. तर अश्या 4-5 वाजता पेटलेल्या ह्या शेगड्यांचा धूर हा तासाभराने निवळायचा ,मग ती लालबुंद निखा-याची शेगडी घरात आणायची व त्यावर स्वयंपाकाला सुरूवात.. संध्याकाळी बहुदा मसाल्याची ( फोडणीची ) खिचडी असायची.. तांदूळ आणि सालीची मूगदाळ किंवा तूरदाळीचा वापर केलेली ही खिचडी .. शेंगदाण्याच्या तेलात कांदा, टोमँटो, आलं, लसूण, दाणे, तिखट व गरम मसाला या सर्वांची फोडणी देवुन केलेली हि शेगडीवरची खिचडी व जोडीला भाजलेल्या बिबड्या किंवा ज्वारीचे पापड व गुळशोपेचंं कैरीचं लोणचं ,हे जेवण म्हणजे अस्सल गावरान बेत! फक्त खिचडीच व्हायची अस काही नाही ,तर भाकरी, ठेचा, झणणझणीत दाळ, कढी हे सुध्दा होतच ,पण या सर्वांना चवं प्राप्त व्हायची ती या शेगड्यांंमुळेच.. याला दुसरी बाजुपण असायची व ती म्हणजे भांडणांची.. कारण शेगडीवरचा स्वयंपाक हा कितीही रुचकर असला तरी त्याचा धूर तसा त्रासदायकच , पण आजुबाजुला सर्वच वापरत असल्यामुळे ,सर्व सहन करायचे पण क्वचितप्रसंगी वाद हे व्हायचे, गल्लीतल्या कुणाकडे नुकताच गँस आलेला असायचा, ते घर अचानक नाही म्हंटल तरी थोडं आभाळात असायच, त्यांना तो धूर आता नकोसा व्हायचा. व तिथुन वादाला तोंड फुटायचे..” ओ इजुच्या आई ,तेव्हढी शेगडी पुढे सरकवी घ्या नं, गह्यरा धूर येतोय आमच्या घरात” ..यावर विजयच्या मातोश्री ” वो माय वो..आत्ताच बरे तुले धूर दिसला व बहीन , अन् तुही शेगडी चेेट्याची ( पेटायची ) तव्हा? मंग काय आता गल्ली सोडनी पडीन का आम्हाले ? इति शेजारीण.”तुम्ही काह्यले जाता..आमीच चाल्ले जाऊ बारे ..शांती नगरले..( त्यावेळेस हा भाग जरा गावाच्या बाहेर होता) पुढच्या वर्षी पलाट बांधला कि जातो व माय आम्ही, ह्या गल्लीत कोन राह्यतय..इति वि.आ. ..शेजारीण : जासान तव्हा जासान, बारे आधी गँस तर घी या.. मग त्यावर प्रतिउत्तर ..मग गल्लीच्या इतरांची,त्या दोन माउल्यांमध्ये ,आधे इधर जाव ,आधे उधर जाव च्या धर्तीवर वाटणी व्हायची,जो तो आपआपल्या परिने त्यात योगदान द्यायचा, शेगडीचा धूर निवळेपर्यंत हे भांडण रंगायचे..पण रात्री त्याच शेगडीवरची खिचडी जेव्हा शेजारणीच्या ताटात पडायची, तेव्हा रात्री खाटेवर बसुन, हेच योगदान देणारे ” शेवटी कसय नं काकु, आपल्या सर्वांलेच येकाच गल्लीत राहनय.. वगैरे म्हणत आपआपल्या पार्ट्या बदलुन घ्यायचे.. व शेगडीवरच्या भांडणाचे ते निखारे ..खिचडीत निवुन जायचे. स्वयंपाक भलेही शेगडीवरचा असेल पण चव मात्र तंदूरच्या थोबाडीत मारण्याएवढि.. शिवाय जेवणाची रंगत वाढवायला चटण्या असायच्याच, त्याची रेसिपी घरापरत्वे बदलत जायची. कुणी दाण्याची ,तर कुणाकडे लाल मिरच्या, दाणे ,लसूण भाजुन केलेला तिखटजाळ खर्डा असायचा, तर कुणी दाणे, कोथंबीर, लसुण, हिरव्या मिरच्या भाजुन केलेली पातळ चटणी करायचे, कळण्याच्या भाजीबरोबर ती हमखास हवीच..हिच चटणी वापरून चवळीच्या शेंगांची पातळ भाजी ,गवारीच्या शेंगांची भाजीसुध्दा करतात. या शेगडीवर भाजलेल्या मिरचीचा ठेचा ( खुडा़) तर झकासचं! सोबत कुरकुरीत ज्वारीच्या भाक-या.. खमंग भाजलेल्या ह्या चटण्या ह्या संपुर्ण जेवणाला पर्याय म्हणुनदेखील वापरल्या जायच्या..शेगडीवरचं पिठलं व भाकरी म्हणजे कहरच.. हिरव्या मिरच्या ,लसूण याची फोडणी दिलेल हे दाळीचं पिठल वर कच्च तेल..मोठा फर्मास बेत.. झालच तर भरीताची वांगी,मिरच्या भाजण,कांदा भाजणे वगैरे जोडकामेही शेगडीवरच व्हायची, शेंगदाण्याच्या कुटासाठी त्यावर दाणे खमंग भाजता यायचे, उडदाचे पापड भाजायला तर शेगडीला डिमांड फार कारण त्याला स्मोकी चव यायची .अश्या शेगड्यांचा मेंटेंनन्स म्हणजे एकच तो म्हणजे स्वयंपाक आटोपला व ती शेगडी गार झाली की त्यामधली पांढरीशुभ्र राख काढुन घ्यायची ( त्याचा उपयोग भांडी घासण्यासाठी) व ती शेगडी छान लिंपुन ठेवायची.. ह्या शेगड्या रिपेअर करणा-यांची गल्लीत चक्कर ठरलेली, अगदीच मोडकळीस आलेल्या शेगड्या ते नीट करुन द्यायचे ,यात शेगडीचा पत्रा किंवा बादली बदलली जायची , ती बादली कुंभाराकडे नेली कि तो नविन लिंपुन द्यायचा कि नविन शेगडी तयार.. अशी ही शेगडी समस्त गृहिणींची सखी आता जवळपास नाहीशी झालीय, अर्थात तिचा होणारा धूर ,लागणारा वेळ हे आताच्या काळात शक्यच नाही , पण शेवटी तुम्हा आम्हा सर्वांच्या आठवणीत तरी हि शेगडी पेटत राहो हिच इच्छा. कारण एक काळ होता ,ज्या काळात तीनं स्वत:ला पेटवुन , तुमचा – आमचा जठराग्नी शांत केला होता..तर मग मंडळी जरा डोकं चालवा, आपल्या फ्लँटच्या लाँफ्टवर ,चुकूमाकून विसरलेली शेगडी असलीच तर शोधा ( फक्त पत्र्याची असेल तरीही ) व होवुन जाऊ द्या ह्या विकेंडला टेरेसवर धुरळा..मस्तपैकी झक्कास बेत ..शिवाय शेजारच्या फ्लँटमध्ये धूर गेला तर मग ” जाळ अन् धूर संगटच”!
©सारंग जाधव