चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. यावर्षी नववर्ष वेगळा संकेत देतंय,
“आत्मचिंतन करा “.
पुन्हा काही दिवसांचा लॉक डाऊन जाहीर होणार. इतकी वर्षे आपण घड्याळाच्या तालावर धावत होतो. प्रत्येकाचे वेगळे ध्येय, आकांक्षा आणि म्हणतात ना
” आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे “
आपण सगळेच अनाहूतपणे यामागे धावतोय ; नेमके काय साध्य करायचे आहे ? याचा विचार केलाय कधी ?
बर! स्वतः ची प्रगती करताना निसर्गाशी समन्वय साधणे हे तरी पुरेसे जमतंय का ? निसर्गाच्या प्रत्येक बाबतीत आपली ढवळाढवळ. निसर्ग निर्मित गोष्टींचा आनंद न घेता आपल्या बौद्धिक क्षमतेने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न. आकाश, धरा, सागर सगळेच यात पोळले जाताहेत. या मंथनातून काय मिळणार ? प्रगती ? की ऱ्हास ?
असो ! हा मुख्य विषय नाहीच. आपण सगळे ज्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय तो त्याचे अस्तित्व सुचकतेने वेळोवेळी दाखवत आपल्याला सावध करतोय. पण त्याकडे कानाडोळा केल्याने आज ही निसर्गशक्ती आपल्याला सक्तीने घरी रहा सांगते आहे.
कारण निसर्ग रिबूट होतोय
आपण या लॉकडाऊन च्या दिवसांत काय करावे? या काळजी ने ग्रस्त आहोत. पण ही एक संधी आहे, असा विचार करू या. घरी राहून आत्मपरीक्षण करू या .आपल्या धावपळीच्या दिनचर्येत वेळ नाही असे म्हणत काय करता येत नाही ; ते सगळे करायला आता वाव आहे .कोणतीही गोष्ट सलग काही दिवस केली तर ती अंगवळणी पडते असे म्हणतात. ही वेळ आहे मनन, चिंतन, मंथन, करून आत्मशुद्धीची. स्वतः तले हरवलेले, राहून गेलेले पूर्ण करण्याची.
बघा या दिवसांत आपल्याला स्वतः ला पैलू पाडत एक वेगळे तेजस्वी व्यक्तीमत्व मिळू शकते.
एक नवी ऊर्जा, चैतन्य लाभेल. आपल्या आयुष्यात विचारात सात्विकता, मनात प्रसन्नता वाढवण्याची संधी आहे .
चला तर आज हा संकल्प करूया !
निरामय आरोग्याची गुढी उभारूया !!
@अपूर्वा वाणी ९४२३९७५९४२