शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांचे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद गँगसोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. डी गँगच्या जवळ असलेल्या युसूफ लकडावालाकडून राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नवनीत राणा यांनी लकडावालाकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असून आता ईडी तपास करणार का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
कोण आहे युसूफ लकडावाला?
युसूफ लकडावाला हा मुंबईतला एक प्रसिद्ध बिल्डर होता. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपात ईडीनं त्याला अटक केली होती. 2019मध्ये आर्थिक गुन्हे शाखेनंही त्याला अटक केली होती. जमीन खरेदीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. तो दाऊदचा निकटवर्ती होता आणि त्याचे मुंबईतील आर्थिक व्यवहार सांभाळत होता, असंही बोललं जातं. आर्थर रोड जेलमध्ये असताना कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला.
लकडावालाशी झालेल्या व्यवहाराबाबत माहिती मिळाल्यास तपास करण्यात येणार असल्याचे संकेत गृहखात्यानं दिले आहेत. तर आरोपांबाबत संबंधित एजन्सी तपास करतील असं सांगत भाजपनंही सावध भूमिका घेतली आहे. हनुमान चालिसावरून निर्माण झालेल्या वादानंतर राणा दाम्पत्याला अटक झाली आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची मालिका सुरू झाली आहे. मात्र डी गँगशी संबंध असल्याचा आरोप गंभीर आहे.