युट्युबवरील नको त्या गोष्टींचा अतिरेक झाल्याने त्याचा धोका जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना प्रकाशझोतात आली आहे. फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांनी यूट्यूब व्हिडिओच्या मदतीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान 28 वर्षीय तरुणाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने युट्युबवरील वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि जीवघेण्या व्हिडिओंचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
ही धक्कादायक घटना घडण्यास काही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. यात सुरक्षेच्या अभावाचा गंभीर मुद्दाही कारण ठरला आहे. ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये न करता एका हॉटेलमध्ये करण्यात आली. प्रजनन अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया नेल्लोर येथील एका खासगी हॉटेलमध्ये कोणतीही वैद्यकीय खबरदारी न घेता केली गेली. कुठल्याही सक्षम वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया केली गेली नसल्यामुळे एका तरुणाचा हकनाक बळी गेला. याप्रकरणी बीफार्माच्या दोघा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
पीडित तरुणाला त्याचे लिंग बदलायचे होते. यादरम्यान तो सोशल मीडियावर बी फार्माच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. त्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणाची दिशाभूल केली आणि त्याच्यावर अत्यंत कमी खर्चात लिंग बदलाची शस्त्रक्रिया करू असे आश्वासन दिले. पुरेसे ज्ञान नसतानाही बी फार्माच्या विद्यार्थ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, कामेपल्ली गावातील पीडित तरुणाचा मृत्यू जास्त रक्तस्त्राव तसेच रक्तस्राव थांबवण्यासाठी दिलेल्या औषधांच्या ओव्हरडोजमुळे झाला. त्याच्यावर हॉटेलच्या ज्या खोलीत शस्त्रक्रिया करण्यात आली, ती खोली अस्वच्छ असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाचा मृत्यू होताच विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यादरम्यान खोलीत मृतदेह आढळल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाली