दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच घेण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्येही आज दहावी आणि बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ या नावाने परिचित असलेला विकास पाठक हा व्यक्ती आहे. हिदुस्तानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
राज्यात कोरोनाचं सावट आहे. अद्यापही हजारो विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. अशावेळी दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळेतच होईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आज परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आली होती. तसंच त्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही केलं होतं. हिंदुस्तानी भाऊच्या या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आणि धारावी, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हिंदुस्तानी भाऊने यूट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन काल केलं होतं. त्यानंतर आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. धारावीमध्ये वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी शेकडो विद्यार्थी जमले. तसंच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नागपूरमध्येही शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर मी वाईट झालो का? असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केलाय.
तसंच कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षाच ऑफलाईन का? हे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहेत. परीक्षा नको असं मी बोललोच नाही. फक्ती परीक्षा पुढे ढकला आणि ऑनलाईन पद्धतीने घ्या अशी आपली मागणी आहे. तीन महिन्यांपासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात हजारो विद्यार्थी असे आहेत की त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेताच आलं नाही.
लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केलं होतं. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केलं की आमच्यासाठी उभे राहा, म्हणून आज त्यांच्यासाठी उभा आहे, असं हिंदुस्थानी भाऊने म्हटलंय. त्याचबरोबर हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की आता घरी जावं. मी वर्षा गायकवाड यांना निवेदन दिलं आहे. त्यात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच त्यांची फी माफ करण्याची विनंतीही करण्यात आल्याचं हिंदुस्तानी भाऊने सांगितलं.